अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याची गरज

0

नवी मुंबई । अत्याचाराची सुरूवात प्रत्यक्ष कृतीतून नव्हे तर लैंगिक अत्याचार करणार्‍या व्यक्तीच्या विचार व धारणांतून होते. जर या विचार व धारणांत सुधारणा केली तर लैंगिक अत्याचार थांबवणे शक्य होऊ शकते. असे मत मानसोपचार तज्ज्ञ वृषाली पाटणकर यांनी व्यक्त केले. कामाच्या ठिकाणी होणार्‍या लैंगिक अत्याचारावरील प्रतिबंध, मनाई व निवारणासंदर्भात अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.

कामाच्या ठिकाणी महिलेला मिळणार्‍या अवांछित वागणुकीविरोधात बोलण्याचा व त्याविषयी तक्रार करण्याचा प्रत्येक महिलेला मूलभूत अधिकार आहे. आपल्या एखाद्या पुरुष सहकार्‍याचे आपल्या सोबत असलेले वागणे किंवा बोलणे जर एखाद्या महिलेला आवडले नाही अथवा अस्वस्थ करणारे वाटले अथवा पटले नाही तर त्याचा विरोध प्रत्येक महिलेने करणे आवश्यक आहे. पुरूषांकडून मिळणारी अशा प्रकारची वागणूक लैंगिक अत्याचाराचाच एक भाग असल्याचे पाटणकर यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे महिलांनी अशा प्रकारचा त्रास सहन न करता आपल्या कामाच्या ठिकाणी असलेल्या लैंगिक अत्याचार विरोधातील अंतर्गत तक्रार निवारण समितीची मदत घ्यावी, असेही यावेळी मानसोपचारतज्ज्ञ पाटणकर यांनी सुचवले.