जळगाव। चाळीसगाव तालुक्यातील बाणगाव येथे मे 2013 ते ऑक्टोबर 2013 दरम्यान एका नराधमाने 13 वर्षीय बालिकेला धमकी देऊन वारंवार शारीरीक अत्याचार केले. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात अतिरीक्त सत्र न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. या खटल्यात सोमवारी अत्याचार करणार्या नराधमाला 10 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. चाळीसागाव तालुक्यातील बाणगाव येथे फिर्यादीच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यांच्या घराजवळ शरद इंदल परदेशी (वय 27) हा राहतो. फिर्यादीच्या दोन्ही मुली आणि एक वृद्ध महिला बांधकाम सुरू असलेल्या घरात झोपण्यासाठी जात होत्या.
बाणगांव येथील घटना…
मे महिन्यात उन्हाळ्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवून त्या झोपत होत्या. या संधीचा फायदा घेत शरद परदेशी याने एके दिवशी रात्री पिडीत 13 वर्षीय बालिकेला तोंड दाबून उचलून आणले. त्यानंतर त्याच्या घराच्या ओट्यावर घेऊन जाऊन अत्याचार करून या संदर्भात कोणाला सांगितले तर तुझ्यासह आई, वडीलांना ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. 12 ऑक्टोबर 2013 रोजी शरद परदेशी याचे गावातील नामदेव संपत पाटील यांच्याशी वाद होऊन भांडण झाले. त्यावेळी शरद याने वाद सुरू असताना फिर्यादीच्या मुलीवर अत्याचार केले. ते माझे काही करू शकले नाही. तु काय करशील. असे म्हटले. त्यावेळी फिर्यादी बाजुला उभे होते. त्यांनी घरी जाऊन मुलीला विचारले. त्यावेळी मुलीने रडत, रडत घडलेली घटना सांगितली. त्यांनतर चाळीसगाव पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी न्यायाधीश अग्रवाल यांच्या न्यायालयात खटला सुरू होता. त्यात सरकारपक्षातर्फे अॅड. निलेश चौधरी यांनी 8 साक्षीदार तपासले.
दहा हजारांचा दंड
बालिकेवर अत्याचार प्रकरणी न्यायाधीश अग्रवाल यांनी आरोपी शरद परदेशी याला कलम 376 (2) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 मधील सेक्शन 6 नुसार दोषी धरले. त्यात कलम 376 (2) अन्वये 10 वर्ष सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंड आणिदंड न भरल्यास 2 महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच या प्रकरणातील पिडीत मुलीला नुकसान भरपाई म्हणून दंडाची रक्कम देण्याचे आदेश दिले. अत्याचार प्रकरणी शिक्षा सुनावली त्यावेळी आरोपी शरद परदेशी न्यायालयात हजर होता. त्याला अटक करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.