अत्रे रंगमंदिर नुतनीकरणासाठी अजून 6 महिने लागणार

0

नाट् रसिकांमध्ये नाराजी व्यक्त

पिंपरी : पिंपरीमधील संत तुकाराम नगर परिसरातील आचार्य अत्रे रंगमंदिरातील नुतनीकरणाचे काम सुरू आहे. मध्यंतरी भुत दिसल्याची अफवा, त्यावर केलेले तंत्र-मंत्र यामुळे झालेली कारवाई बरेच दिवस चर्चेत होते. मात्र सर्व सुरळित झाल्यावरही रंगमंदिराच्या नुतनीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. विशेष म्हणजे कामाची मुदत उलटूनही काम पूर्ण झाले नाही. बहुतेक काम पुर्ण होण्यासाठी दिवाळी उजाडणार आहे. त्यामुळे नाट्य रसिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नूतनीकरण पूर्ण होण्यासाठी अजूनही 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागणार आहेत.

अद्यापही बरेचसे काम अपुर्ण
महापालिकेने अत्रे नाट्यगृहाच्या नुतनीकरण कामासाठी ठेकेदार नेमला आहे. 24 ऑगस्टपासून कामाला सुरूवात झाली आहे. 9 महिन्यांची मुदत या कामासाठी देण्यात आली होती. मे 2018 अखेर पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी एका कामगाराला भूत दिसल्याने संपूर्ण कामगार वर्ग काम करायला तयार नव्हता. कामगार अक्षरशः काम सोडून पळून गेले. यासाठी ठेकेदाराने मांत्रिकाला आणले आणि पूर्ण पूजा करून घेतली. या प्रकरणी ठेकेदारासह अन्य तिघांना अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यांतर्गत अटक देखील झाली होती. या सर्व घडामोडींमध्ये या कामाचा खोळंबा झाला. अंधश्रध्देच्या घटनेवर पडदा पडल्यानंतर कामाने वेग घेणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही बरेचसे काम अपुर्ण आहे.

अजून 6 ते 7 महिने लागणार
नवीन खुर्च्या, फॉल्स, सिलींगचे काम, रंगमंचावरील मंडप, स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा या पहिल्या टप्प्यात केल्या जाणार होत्या तसेच दुसर्‍या टप्प्यात नाट्यगृहाच्या इलेव्हेशन पद्धत, लॉबीचा विस्तार व वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगचे काम केले जाणार होते. मात्र सर्वच कामे अर्थवट अवस्थेत असल्याचे दिसून आले. अद्यापही 50 टक्केच पुर्ण झाले असून बाकीचे कामे होण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर उजाडण्याची शक्यता आहे. रसिकांनाही नाट्य – कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.