अदिल अऩ्सारीची बिजिंगच्या जागतिक स्पर्धेसाठी निवड

0

मुंबई । स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या धनुर्धारी अदिल अन्सारी यांची बिजिंग येथे 12 सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या वर्ल्ड आर्चरी पॅरा चॉम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीमुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. अदिल अन्सारीने 2015 पासून सावरकर आर्चरी अकॅडमीतून सरावाला सुरूवात केली. 2016 मध्ये त्याने हरयाणा येथील रोहतांग येथे झालेल्या नॅशनल पॅरा आर्चरी स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. ज्यावेळी पॅरा आर्चरी प्रकार नव्हता तेव्हा त्याने खुल्या स्पर्धेत सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी केली होती.

त्याच्या या दोन्ही प्रकारातील कामगिरीचा विचार त्याची निवड करण्यासाठी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पॅरा आर्चरी प्रकारात सहभागी होणा-या खेळाडूंच्या शारिरीक पातळीत 90 टक्के इतका दिव्यांग आहे. त्याच्या सरावासाठी प्रशिक्षक स्वप्नील परब यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी त्याला जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.