अद्यापही धर्मा पाटलांना न्याय नाही!

0

मुंबई: न्याय मिळावा म्हणून मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांना अद्यापही न्याय मिळाला नसल्याने त्यांच्या परिवाराने त्यांच्या अस्थींचे विसर्जन केले नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. धर्मा पाटील यांना न्याय मिळत नाही तोवर अस्थीविसर्जन करणार नसल्याचा पवित्रा त्यांच्या परिवाराने घेतला असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी तत्पर आहे. त्यासाठी प्रसंगी अजून वेगळे आंदोलन करू असे तटकरे यावेळी म्हणाले. हल्लाबोल आंदोलनासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

उत्तर महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद
तिसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनाला उत्तर महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्याचे तटकरे यांनी सांगितले. 6 दिवसात 21 सभा झाल्या असून मराठवाड्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे ते म्हणाले. या यात्रेत जनतेमधून सरकारबद्दल प्रक्षोभ दिसून आला असल्याचा दावा त्यांनी केला. 10 तारखेला नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप होणार असल्याचे ते म्हणाले. 26 तारखेला 4 थ्या टप्प्यातील पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनाची बैठक असून अधिवेशनानंतर ते आंदोलन केले जाणार असल्याचे तटकरे म्हणाले. 28 तारखेला मुंबईत हल्लाबोल केला जाणार असून आझाद मैदानावर याचे आयोजन केले जाणार आहे.

काँग्रेससोबत एकत्र येणार
आज काँग्रेस बरोबर बैठक झाली असून यामध्ये दोन्ही पक्षाकडून महत्वाचे पाच-पाच नेते उपस्थित होते. आगामी काळात एकत्रित येण्याबाबत चर्चा या बैठकीत झाली असल्याचे तटकरे यांनी सांगितले. या बैठकीत विविध निवडणुकांबाबत प्राथमिक चर्चा केली असल्याचे ते म्हणाले. 25 तारखेला सर्व विरोधी पावसाच्या गटनेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर आयोजित केली असल्याचे ते म्हणाले. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची पुढील दिशा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.