Adavad woman extorted 16 lakhs by showing the lure of investment चोपडा : हरीयाणामधील फ्युचर मेकर लाईफ केअर प्रा. लि. आणि इतर कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोपडा तालुक्याील अडावद येथील विवाहितेला 16 लाखांत गंडवण्यात आले. या प्रकरणी अडावद पोलिसात सहा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
प्रतिभा हिरालाल पाटील (38, रा.लोणी, ता.चोपडा) यांनी याबाबत फिर्याद दिली. हरीयाणातील हिस्सारमधील फ्युचर मेकर लाईफ केअर आणि इतर कंपनीच्या नावाखाली विनोद पाटील, स्वाती रमेश जाधव, रमेश जाधव (रा.चोपडा), कल्पना बाळू पाटील, बाळू पाटील, गजानन पाटील (रा. पंचक ता.चोपडा) यांनी विश्वास संपादन करीत 30 मे 2017 ते 2022 पर्यंत तब्बल 16 लाख 2 हजार 500 रुपयात फसवणूक केली. प्रतिभा पाटील यांनी सोनं, जमीन आणि बचत केलेली रक्कम अधिक परताव्याच्या अपेक्षेने गुंतवली होती. परंतू पैसे परत मिळत नसल्यामुळे अखेर त्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास राजपूत करीत आहेत.
अगोदर बक्षिसे दिल्यामुळे गुंतवणूदार आकर्षित
फ्युचर मेकर लाईफ केअर कंपनीने विविध लोकांना कार दिल्याचे तसेच त्यांना कंपनीने लाखो रुपये कमिशनपोटी दिल्याचे बँक स्टेटमेंट कार्यक्रमात दाखविण्यात येत होते. कंपनीच्या संचालकांनी मोठा परतावा आणि इतर लाभ देण्याचे आश्वासन दिल्याने अनेकांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. साडेसात लाख रुपये गुंतवा तसेच इतरांनाही गुंतवणूक करायला लावून जास्तीत-जास्त परतावा आणि इतर फायदे मिळवा, असे आमिष दाखवून हरीयाणामधील फ्युचर मेकर लाईफ केअर प्रा. लि. कंपनीने औरंगाबादेतील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे जून 2019 मध्ये समोर आले होते. कंपनीने 13 लाख 31 हजार 639 रुपयांची फसवणूक केल्याची पाच जणांनी तक्रार त्यावेळी नोंदवली होती.