जळगाव । जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा व जलव्यवस्थापन समितीची सभा बुधवारी 21 रोजी घेण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी हे दोन्ही अधिकारी हजर नसल्याने समिती सभा तहकुब करण्यात आली. अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर हे रजेवर असल्याने त्यांनी सचिव पदाचा कारभार लघुसिंचन विभाग कार्यकारी अभियंता राजन नाईक यांच्याकडे दिला होता. मात्र समिती सदस्यांनी नाईक यांच्या उपस्थितीत समिती सभा घेण्यास नकार दिल्याने सभा तहकुब करण्यात आली. अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे तसेच पावसाळा सुरु झाल्याने पाण्याच्या नियोजनाबाबत चर्चा या समितीत होणार होती. जबाबदार अधिकारी हजर नसल्याने प्रश्नांची दखल कोण घेणार? असा प्रश्न करत सभा घेण्यास सदस्यांनी विरोध दर्शविला. येत्या दोन-तीन दिवसात सभा कायम करण्यात येणार आहे.