अधिकारी-कर्मचार्‍यांनी खिलाडूवृत्ती ठेवावी – दिपक कुमठेकर

0

जळगाव – प्रत्येक खेळात जिंकणे वा हारणे यापेक्षा आपली कामगिरी उंचाविण्याला महत्व असते. तेंव्हा औरंगाबाद व जळगांव परिमंडळाचा सर्वोत्कृष्ट संघ राज्यस्तरीय स्पर्धेत पाठविण्यासाठी निवड चाचणीत सहभागी झालेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी खिलाडूवृत्ती ठेवावी, असे प्रतिपादन जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले.

या खेळांसाठी निवड चाचणी
या चाचणी स्पर्धेत औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण , धुळे, जळगांव, जालना, नंदूरबार या सहा मंडळातील 238 अधिकारी-कर्मचारी खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक अशा 22 क्रीडाप्रकारात सहभाग घेतला. या चाचणीस्पर्धेत अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू सहभागी झाले. कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबलटेनिस, बुध्दिबळ, कॅरम, टेनिकॉईट, ब्रीज, कुस्ती, धावणे, रिले, उंचउडी, लांबउडी, गोळाफेक, थाळीफेक व भालाफेक या खेळांसाठी चाचणी घेऊन संघ निवडीची प्रक्रिया पार पडली.

महावितरणचे दिव्यांग कर्मचारी किशोर नेमाडेंचा सत्कार
महावितरणच्या जळगाव परिमंडळाच्या वतीने अधिकारी-कर्मचार्‍यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा, या हेतुने आयोजित राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा 2018-19 करीता औरंगाबाद व जळगाव परिमंडळाचा संयुक्त संघ निवड चाचणी जळगावच्या एकलव्य क्रीडा संकुलात झाली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कुमठेकर बोलत होते. यावेळी मंचावर अधिक्षक अभियंता(पायाभुत आराखडा) चंद्रशेखर मानकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) धैर्यशिल गायकवाड, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजे भोसले, कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर , कामगार कल्याण विभागाचे केंद्रप्रमुख मिलींद पाटील व भानुदास जोशी एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. तद्नंतर सर्वांनी क्रीडाशपथ घेतली. यावेळी कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आपातकालीन परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी बजाविल्याबद्दल महावितरणचे दिव्यांग कर्मचारी किशोर नेमाडे (वरिष्ठ तंत्रज्ञ) यांचा स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर, सुत्रसंचालन सहाय्यक अभियंता रत्ना पाटील तर आभार जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी मानले