अधिकारी, ठेकेदारांच्या संगनमताने भ्रष्टाचार

0

धुळे । कचर्‍याच्या घाणीत महापालिकेतील भ्रष्टाचाराने बरबटलेले अधिकारी आणि कचरा संकलनाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने तोंड खुपसले असून संगनमताने त्यांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे. भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांनी धुळेकरांच्या जीवाशी खेळ करण्याचा जीवघेणा अघोरी उद्योग सुरु केला असून त्यांच्याविरुध्द कारवाई करा अशी मागणी आज संतप्त नगरसेवकांनी महासभेत केली.याप्रकरणी महापौर सौ.कल्पना महाले यांनी ताबडतोब चौकशीचे आदेश दिले असून अहवाल सादर करा असेही आदेश दिले आहेत. या चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे सौ.महाले म्हणाल्या. महापौर सौ. कल्पना महाले यांच्या अध्यक्षतेखाली आज महासभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

सहाय्यक आरोग्य अधिकार्‍याची बदली करा
आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराला सहाय्यक आरोग्याधिकारी हेच जबाबदार असून त्यांची इतरत्र बदली करावी, त्याशिवाय आरोग्य विभागातील भ्रष्टाचार बंद होणार नाही. लाखो रुपयांची खोटी देयके प्रमाणित करतांना अधिकार्‍यांनी हात ओले केले आहेत. यासर्वांची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आरोग्य विभागाच्या कारभारावर अनेक सदस्यांनी आवाज उठविला. महापौर सौ. कल्पना महाले यांनी प्राथमिक स्तरावर चौकशी करुन अहवाल सादर करण्याबाबत आयुक्तांना सुचना केल्या आहेत.

विकासकामे खोळंबली
महानगरपालिकेतील सर्व सदस्यांना 10 लक्ष रुपयांची कामे प्रभागात करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने विकासापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. नागरिकांच्या रोषाला स्थानिक नगरसेवकांना समोरे जावे लागते. असा प्रश्‍न नगरसेवक अमोल मासुळे, अमिन पटेल, सतीश महाले यांनी उपस्थित केला. त्यावर येत्या डिसेंबर अखेरपर्यंत निधी मंजूर करुन कामांना प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती महापौर सौ. कल्पना महाले यांनी दिली. देवपुरातील सर्वे क्र.13/1 मध्ये स्व. उत्तमराव पाटील स्मारक असून याठिकाणी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु त्याठिकाणी कोणत्या कामावर हा निधी खर्च केला जाईल याचा जाब नगरसेविका सौ. प्रतिभा चौधरी यांनी महासभेत विचारला. सभेला सर्व नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

विरोधकांचा महासभा चालू न देण्याचा इशारा
जुने धुळे येथील नागरिक तसेच मनपा हद्दीस लागून असलेले डंपींग ग्राऊंड नागरिकांच्या आरोग्यास नव्हेतर जीवीतास धोका निर्माण झाला आहे. मुदत बाह्य डंपींग ग्राऊंडवर कचरा टाकणे तात्काळ बंद करावे. अन्यथा यापुढे महासभा चालवू देणार नाही, असा इशारा गंगाधर माळी यांनी महासभेत दिला. मुदत बाह्य डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकल्यास संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद कायद्यात केली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विरोधीपक्ष नेते गंगाधर माळी यांच्या रोषाला सामोरे गेलेले आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले की, शासकीय जागेची मागणी केली असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. प्रदुषण बोर्डाची एनओसी देखील आवश्यक आहे. कायदेशीर पुर्तता केल्यानंतर नव्या ठिकाणी डंपिंग ग्राऊंडची व्यवस्था केली जाईल, असे आश्‍वासन दिले.

शहरात फिरतात कागदोपत्री घंटागाड्या
धुळे महानगर हद्दीतील कचरा संकलनासाठी सुमारे 4 कोटीचा ठेका हा मक्तेदाराला देण्यात आला आहे. अटी-शर्तींचे उल्लंघन करीत सर्रासपणे खोटी देयके प्रमाणीत करुन अधिकारी आणि ठेकेदारांनी मनपाची आर्थिक लूट करण्याचे काम चालविले आहे. विविध प्रभागांमध्ये कचरा संकलनासाठी घंटागाड्या फिरत असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात येत आहेत. प्रभागात फिरतांना घाणीचे ढीगारे, घाणीचे साम्राज्य जैसे थे पसरलेले दिसून येते. असे असतांना आठ दिवसांपूर्वी 32 लाखांची खोटी देयके प्रमाणीत करणार्‍या भ्रष्ट अधिकारी, ठेकेदार यांची चौकशी करावी. अशी मागणी नगरसेवक फिरोज लाला शेख यांनी केली. डेंग्यूमुळे त्यांच्या प्रभागात युवकाचा मृत्यू झाला. याला आरोग्य विभागातील यंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.