अधिकारी दिसेना, समस्या सुटेना

0

रावेर।  गटविकास अधिकारी दिसेना आणि ग्रामीण भागाच्या समस्या सुटेना अशीच काहिशी अवस्था पंचायत समितीत झालेली दिसत आहे. त्यामुळे सतत कार्यालयातून गायब राहणार्‍या अधिकार्‍यांमुळे सर्वसामान्य जनतेत प्रचंड संताप व्यक्त केला जात असून वेगवेगळ्या तालुक्यातील खेड्यांवरुन आपली कामे घेऊन आलेल्या जनतेला तासंतास अधिकार्‍यांची वाट पाहत बसावे लागते त्यामुळे पंचायत समितीमधील अधिकार्‍यांचे अप-डाऊन पुन्हा चर्चेत आले आहे. मागील अनेक वर्षापासून पंचायत समितिला लागलेले अप-डाऊनचे ग्रहण कधीही न सूटणारे दिसत आहे. परंतु येथे रुजू झालेल्या कर्तव्यदक्ष अधिकारी सानिया नाकाडे याकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडवतील अशी आशा सर्वसाधरण जनतेला होती परंतु स्वत:च गटविकास अधिकारी अप-डाऊन करणार्‍यांच्या पंगतीत जाऊन बसल्याने हा संपूर्ण न्याय कोणाकडे न्यावा असा प्रश्न जनतेला पडलेला आहे.

ग्रामीण भागातील विकासकामेही रेंगाळली
पंचायत समिती हे तालुक्यातील मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. पाणी पुरवठा असो, रस्ते, पथदिवे आदी मुलभूत सुविधांसाठी प्रत्येक गावात विकास कामाचा आराखडा करुन तो राबविण्याचे काम हे पंचायत समितीमार्फत केले जाते. मात्र अधिकार्‍यांच्या अप- डाऊनमुळे काम करण्यास त्यांना वेळच मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कामे देखील रेंगाळलेली आहेत.

मुख्याधिकार्‍यांनी लक्ष द्यावे
येथील गटविकास अधिकारी जळगाव येथून येऊन पंचायत समितीचा कारभार चालवतात. नाकाडे यांना कार्यालयात येण्यास नेहमीच विलंब होत असतो. त्यामुळे तासंतास गावकडील जनतेला वाट पाहत तात्कळत उभे रहावे लागते याकडे वरीष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. गटविकास अधिकार्‍यां खालोखाल येथे काम करत असलेले निम्मे कर्मचारी रावेर बाहेरुन अप-डाऊन करतात हा सर्व प्रकार बिडिओना सुद्धा माहिती आहे. परंतु अधिकारी, कर्मचारी दोघेही अप-डाऊनच्या विळख्यात असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी यातून यांना मुक्त करावे अशी मागणी जनतेतुन होत आहे.

ग्रामीण जनतेची होते फजिती
तालुक्यातील खेड़े लांब असल्याने गरीब जनतेला रोजंदारी टाकून वेगवेगळ्या कामांसाठी पंचायत समितीत यावे लागते परंतु येथील कर्मचारी य बैठकीला गेले, साईटवर गेल्याचे सांगतात. प्रत्यक्षात अधिकारी रेल्वे किंवा आपली खाजगी गाडी घेऊन जळगाव येथून येतात. त्यामुळे ग्रामीण जनतेची फजीती होते अशीच अवस्था उटखेड़ा येथून समस्या घेऊन रोजभाग सोडून आलेल्या गरीब महिला मजुराना वाट पाहत बघावी लागली.