जळगाव । जळगाव महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी चारही प्रभाग अधिकारी यांना नालेसफाई करण्याचे आदेश केले होते. त्यानुसार प्रभाग अधिकारी यांनी शहरातील 5 प्रमुख नाल्यांची सफाई केल्याचा अहवाल दिला होता. मात्र पहिल्याच पावासात नालेसफाईचे पितळ उघडे पडले. त्यामुळे आयुक्तांनी आता प्रशासनातील इतर अधिकार्यांकडून नाल्यांच्या सफाईच्या कामांची पाहणी करण्याचे आदेश काढले आहे. याबाबतचा अहवाल 14 जुन पर्यंत सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. जळगाव शहरात शनिवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने जळगाव शहराला अक्षरश: धुवुन काढले. मध्यरात्री सुरु झालेल्या दमदार पावसाने अवघ्या तीन तासात संपूर्ण शहर जलमय केले. पावसामुळे शहरातील सर्व नाले व ओढे आसांडले. नालेसफाईअभावी नाल्याचे पाणी रस्त्यावरुन घरांमध्ये घुसले. यामुळे महापालिकेने केलेल्या नालेसफाईवर संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त यांनी नालेसफाई खरोखर झाली की, नाही याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तपासणी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नाल्याच्या सफाईची पाहणी केली जाणार आहे. शहरात 23 कीमी लांबीचे 5 मोठे नाले आहेत. तर लहान मोठे 20 नाले आहेत.
अहवाल 14 जूनपर्यंत सादर करण्याचे आदेश
तपासणी अधिकारी यांनी नालेसफाईची तपासणी करुन त्याचा अहवाल 14 जूनपर्यंत सादर करण्याचे आदेश देखिल आयुक्तांनी दिले आहेत. तपासणी अधिकारी यांच्यात प्रभारी शहर अभियंता सुनिल भोळे, लक्ष्मण सपकाळे, सुनिल गोराणे, डि.एस. खडके, चंद्रकांत पंधारे, एस.एस. पाटील,अनिल बिर्हाडे या अधिकार्यांचा समावेश आहे. दरम्यान पाच प्रमुख नाल्यांची सफाईचे आदेश देण्यात आले होते परंतू शहरात झालेल्या दमदार पावसामुळे गटारीतील कचरा आणि गाळ रस्त्यावर आल्याने नाल्यांची सफाई झाली की नाही? असा प्रश्न उपस्थित होते होत आहे, त्यामुळे अधिकार्यांना नालेसफाई कामांची पहाणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.