शिधापत्रिकासाठी धारकांची फिरफिर; इतर कर्मचार्यांची अरेरावची भाषा
रेशनधारकांची मोठ्याप्रमाणावर पायपीट; तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष
जळगाव (जितेंद्र कोतवाल) – रेशनकार्डमध्ये नाव वाढविणे, नाव कमी करणे तसेच रेशनकार्ड इतर गावातील पुरवठा विभागात वर्ग करणे यासाठी रेशनकार्डधारकांकडून दलालांसह संबंधित कर्मचारी अव्वाच्या सव्वा रक्कम घेवून कामे करत असल्याचा प्रकार जळगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात होत आहे. नावे बदलविणे किंवा तत्सम कामे करण्यासाठी संबंधित कर्मचार्याला पैसे न मिळाल्यास अर्जदारास आपली कामे करून घेण्यासाठी ’आज या किंवा उद्या या’ पायपीट करायला सांगतात.
पुरवठा निरीक्षक अधिकारी गायब
आज पुरवठा विभागात जनशक्ती प्रतिनिधी यांनी पुरवठा कार्यालयात जावून पुरवठा निरीक्षक अधिकारी यांच्याबाबत विचारणा केल्यास तेथील महिला कर्मचारी यांनी उडवाउडवीची उत्तरे देत सांगितले की, ’साहेब जिल्हाधिकारी कार्यालयात मिटींगसाठी गेले आहे, साहेब केव्हा येतील हे आम्हाला माहित नाही’. असे सांगून नाक मुरडतात. मात्र दुसरीकडे पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालयातच्या परीसरात एका ठिकाणी दिसून आले. एकंदरीत शासकीय कामे करण्यासाठी अधिकार्यांची नेमणूक केली असतांना दुसरीकडे रेशनधारकांची मोठ्याप्रमाणावर पायपीट होते याकडे तहसील प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे.
जिल्हाधिकार्यांचा आदर्श घ्यावा
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर 23 ते 27 ऑक्टोबर 2018 मध्ये डेंग्यू झाल्यावर खासगी रूग्णालयात उपचार घेत होते. वास्तविक त्यांनी उपचार घेत असतांना आराम करण्याची गरज होती. मात्र त्यांनी असे न करता ऑफिसची कामे रूग्णालयात गेल्यावर शासकीय कामांना कोणताही अडचण निर्माण होवू नये यासाठी बसल्याबसल्या फाईल पुर्ण करण्याची काम सुरू होते. असे असतांना महिन्याभरापासून तहसीलदाराच्या टेबलावर शिधापत्रिके बानविण्यासह इतर कामांची प्रकरणे पडून आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांची स्वाक्षरीविना कामे न होता त्यांना परत जावे लागते. अर्जदारास मनस्ताप झाल्याने जादा पैसे देवून कामे करून घ्यावे लागत आहे. यात विशेष करून वृद्ध, विधवा व निराधार यांचे कामे पैश्यांशिवाय होणे अशक्य नाहीच.