अधिकार्‍यांच्या उडवाउडवीच्या उत्तरांने सदस्यांसह आयुक्त नाराज

0

जळगाव । आरोग्य विभागाकडील वाहन (कॉम्पॅक्टर) वहनाची दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी सभेत आल्यावर वाहन विभागातील वाहने नेहमीच नादुरूस्त राहत असल्याचे सदस्य नितीन बरडे यांनी प्रश्‍न उपस्थित केला. किरकोळ कामांसाठी 5 ते 6 गाड्या बंद असल्याचे बरडे यांनी सभागृहाच्या निर्देशनास आणून दिले. याला उत्तर देतांना वाहन अधिक्षकांनी दुरूस्तींसाठी वार्षिक मक्तेदाराला दिले असल्याचे सांगितले. त्या मक्तेदाराला अ‍ॅडव्हन्स दिल्यावर काम करण्यात येत असल्याचे सांगितले. यावर आयुक्त जीवन सोनवणे वाहन अधिक्षकांना समस्या सूटत नसल्यास वरिष्ठांना का सांगितले नाही अशी विचारणा केली. ही स्थायी सभा सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव डी.आर. पाटील उपस्थित होते. दरम्यान तहकूब सभेचे इतीवृत्त कायम करण्यात आले.

त्रुटी दुर करणार
आरोग्य विभागाला स्वंतत्र वाहन दिले जावेत अशी मागणी पृथ्वीराज सोनवणे यांनी केली. आरोग्याच्या वाहनांविषयी प्रश्‍न उपस्थित केला असता आरोग्य व वाहन विभाग एक दुसर्‍याला दोष देतात पृथ्वीराज सोनवणे यांनी सांगितले. एक दुसर्‍या दोषी दाखविण्याची पद्धत बंद करण्याची मागणी सोनवणे यांनी आयुक्तांनी केली. आकडेवारीच्या खेळात न जाता काय त्रुटी होत आहेत त्या दुरूस्त करण्यावर भर देणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

डिपॉझीट न घेताच सागर पार्क केला जाते उपलब्ध
आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील योग्य कारवाई करीत नसल्याची तक्रार उज्वला बेंडाळे यांनी केली. सागर पार्क येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतात याकार्यक्रमानंतर तेथे कचरा साचत असतो. तो कचरा आरोग्य विभागाकडून उचलला जात नसल्याचे बेंडाळे यांनी सांगितले. ठेकेदाराच्या गाड्या कचरा उचलण्यासाठी येत नसल्याने ठेकेदार मॅनेज झाले असल्याचा आरोप बेंडाळे यांनी केला. महासभेने सागर पार्क येथे कार्यक्रम घेण्यासाठी डिपॉझीट घेण्याचा ठराव केलेला असतांना किरकोळ विभागाकडून आयोजकांकडून डिपॉझीट का घेेत नाही याची विचारणा आयुक्त सोनवणे यांनी किरकोळ करवसूली विभागाचे चौधरी यांना केली. सागर पार्क येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर आयोजकांनी स्वच्छता केली नाही तर ती स्वच्छता डिपॉझीटमधून करण्यात यावी असा ठराव महासभेने पारित केलेला असतांना अधिकारी काम करीत नसल्याने आयुक्त सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच वाहन विभागाला किरकोळ खर्चासाठी निधी दिलेला असतांना त्याचा उपयोग करण्यात येत नसल्याची विचारणा यावेळी केली. निधी देवूनही काम होत नसल्याने अधिकार्‍यांचा आढावा घेणार असल्याचे आयुक्तांना सभागृहात सांगितले.

सागर पार्कला वॉल किंवा तार कंपाऊंड करा
सागर पार्क येथे वॉल कपाउंड किंवा तार कंपाऊंड करण्यात यावे तसेच तेथे लाईटची व्यवस्था करण्याची मागणी उज्वला बेंडाळे यांनी केली. दरम्यान, पृथ्वीराज सोनवणे सोनवणे यांनी गाड्यांच्या दुरूस्तीसाठी 50 हजार रूपयांचा निधी मागील तीन आयुक्तांच्या कार्यकाळात राखीव ठेवण्यात आलेला असतांना किरकोळ दुरूस्तीसाठी का करण्यात येत नाही अशी विचारणा करत याला जबाबदार कोण आहे असा प्रश्‍न सोनवणे यांनी उपस्थित केला. याला उत्तर देतांना विभाग प्रमुख जबाबादार असल्याचे आयुक्त सोनवणे यांनी स्पष्ट केले. किरकोळ कामांसाठी अडव्हान्स देवूनही काम का होत नाही असा प्रश्‍न पृथ्वीराज सोनवणे यांनी उपस्थित केला आयुक्त सोनवणे यांनी याचा आढावा घेणार असल्याचे सांगितले.
तीन महिन्यांपासून स्कीप लोडर बंद

सदस्या उज्वला बेंडाळे यांनी त्यांच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये गेल्या तीन महिनांपासून स्कीप लोडर बंद असल्याचे सांगितले. गेल्या तीन आठवड्यांपासून वार्डांत कचरा साचून राहिल्याची तक्रार बेंडाळे यांन केली. वाहनांचे नुतनीकरण दरवर्षी कोणत्या तारखे पर्यंत करावयाचे असते याची विचारणा बेंडाळे यांनी केली असता वाहन अधिक्षकांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. तसेच वाहन विभागातील गाड्यांचे परिवहन विभागात दरवर्षी 31 जानेवारी पर्यंत पासिंगचे नुतनीकरण करणे आवश्यक असतांना यावर्षी या वाहनांचे नुतनीकरण 31 जानेवारीनंतर करण्यात आले नसल्याचे बेंडाळे यांनी स्पष्ट केले. वाहन अधिक्षकांनी वेळेत नुतनीकरण केले नसल्याने महानगर पालिकेला पासिंग करतांना दंड भरून पासिंग करावे लागत असल्याने दंडाचा आर्थिक भूदंड सहन करावा लागत असून पालिकेच आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप बेंडाळे यांनी केला. अधिकारी उडवा उडवीचे उत्तर देतात असे आरोप केला आहे. तीन महिन्यापूर्वी गाडी खराब झाल्याचा ड्रायव्हरने रिपोर्ट केला आहे. यागाडीची दुरूस्ती आता करण्यात आली आहे.

वाहन विभागाचा प्रश्‍न ऐरणीवर
गाडी रिपेअर करायला येवढा वेळ का लागला याची विचारणा बेंडाळे यांनी केली. याचे उत्तर देतांना आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी हा प्रश्‍न आमचा नसल्याचे सांगून हात झटकले व हा प्रश्‍न वाहन विभागाचे असल्याचे सांगितले. याकडे आरोग्य अधिकारी डॉ. पाटील लक्ष देत नसल्याने स्कीप लोडरची समस्या उद्भवल्याचे यावेळी सांगितले.
अग्निशमन अधिक्षकांची चौकशी

अग्निशमन अधिक्षकांच्या चौकशीचे काय झाले याची विचारणा पृथ्वीराज सोनवणे यांनी केली. अग्निशमन अधिक्षक कोळी यांनी कार्यालयातील कॉम्प्युटर घरी नेला होत. तसेच फटाके विक्रत्यांकडून 18 हजार रूपयांची लाच घेतल्याचा अरोप नितीन बरडे यांनी केला होता. चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशी अधिकारी निरंजन सैंदाणे हे रजेवर असल्याने ही चौकशी होवू शकलेली नाही. ही चौकशी डी. आर. पाटील करणार आहेत.