बोदवड । तालुक्यात धानोरी, कोल्हाडी येथील सिमेंट, नाला बंधार्याची कामे केेली जात आहे. मात्र या कामांमध्ये वापरले जाणारे साहित्य हे गुणवत्तापुर्वक वापरले जात नसल्याचे दिसून येते. काम सुरु असतांना लघुसिंचन विभागाचा कोणताही कर्मचारी याठिकाणी हजर नसल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अशा प्रकारे केली जाणारे कामे हि दीर्घकाळ टिकू शकत नाही. यामुळे शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे दिसून येते. या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
तालुक्यात सुरु असलेल्या या बंधार्याच्या कामात सिमेंटसह आसारीचा वापर केला जातो. मात्र यामध्ये वापरली जाणारी आसारी पाहिजे त्या प्रमाणात बांधणी केेली जात नाही. काम सुरु असतांना मुल्यमापनाकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात अधिकार्यांना या कामाच्या छायाचित्रासह लेखी तक्रारी करुन देखील दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधित ठेकेदाराचे हित साधले जात असल्याचे दिसून येते. काँक्रिट भराव करतांना बंधार्याच्या पायात प्रमाणापेक्षा जाड खडी व दगडगोटे वापरले जातात. याचा परिणाम बंधार्याच्या मजबुतीवर होऊन पावसाळ्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास संपुर्ण कामाचे पितळ उघड पडेल.
प्रमाणित खडीऐवजी वापरले जाता दगडगोटे
कामाची गुणवत्ता उच्चतम राखण्यासाठी तांत्रिक परिक्षण वेळोवेळी होणे आवश्यक आहे. यात काँक्रिट करतांना रेतीऐवजी खडीमशिनवरचा कस वापरला जातो. प्रमाणित खडीऐवजी मोठ्या आकाराचे दगड वापरले जातात. काम सुरु असतांना याठिकाणी कामाचा फलकावर ठेकेदार व संबंधित एजन्सीचे नाव व कामाचे विवरण लावणे आवश्यक असते.
समितीने करावी तपासणी
प्रत्येक कामाची सुरुवात झाल्यानंतर त्याठिकाणी कोणत्या योजनेतून काम केले जात आहे. याचा फलक असतो. परंतु याठिकाणी कुठलाही फलक लावण्यात आलेेला नाही. दरम्यान, धानोरी सिमेंट बंधार्यात अंदाजपत्रक व नकाशाप्रमाणे आसारीची बांधणी करण्यात आली आहे का? पायाची खोली मापानुसार आहे का? यामध्ये आसारीचा खरोखर वापर करण्यात आला आहे का? याची तपासणी गुणवत्ता विभागाने करण्याची गरज आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व उपविभागीय तालुकास्तरीय समितीने चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.
दर्जा पाहून देयके अदा करावी
या संपुर्ण कामाचे अंतिम देयके अदा करतांना संबंधित विभागाकडून आलेल्या तक्रारीची शहानिशा करुन, कामाची गुणवत्ता तपासून मगच झालेल्या कामाचे देयके अदा करण्यात यावे, यात वापरण्यात आलेले साहित्य कोणत्या दर्जाचे आहे. किती प्रमाणात त्याचा या कामासाठी वापर करण्यात आला आहे. याच्या संपुर्ण बाबी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणी करावी लागते. परंतु तालुक्यातील मागील वर्षाची कामे व चालू वर्षातील कामे या सर्व कामांची चौकशी करतांना अधिकारी दिसत नाही.