अधिकार्‍यांना शिवीगाळ करणार्‍या दोघांचा जामीन फेटाळला

0

जळगाव : महापालिकेत लोकशाही दिनाच्या तक्रारींची सुनावणी सुरू असताना 2 जानेवारी रोजी भगतसिंग कर्मचारी संघटना व जिल्हा जागृत जनमंचच्या पदाधिकार्‍यांनी गोंधळ घातला होता. त्यात आयुक्त-उपायुक्तांसह इतर अधिकार्‍यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन्ही संशयिताना बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. गुरूवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी त्यांचा जामीन फेटाळला आहे.

महापालिकेतील सभागृहात 2 जानेवारी रोजी लोकशाही दिनानिमित्त तक्रारी स्विकारणे सुरू होते. आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार, शहर अभियंता दिलीप थोरात हे तक्रारी स्विकारत होते. त्याचवेळी अनिल नाटेकर, शिवराम पाटील यांनी तक्रार देण्यासाठी सभागृहात जाऊ द्यावे म्हणून गोंधळ घातला. त्यानंतर टेबलवर ठेवलेले कागदपत्र फाइलींची फेकफाक करून अधिकार्‍यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी उपायुक्त कहार यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक करून पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायाधीश पाटील यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तसेच त्यांच्या जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यावर तपासाधिकारी आशीष रोही यांचा खुलासा मागिविला होता. गुरूवारी त्यांनी खुलासा सादर केला. त्यानंतर सरकारपक्षाचा युक्तिवाद मान्य करीत न्यायाधीश पाटील यांनी दोन्ही संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. अनिल गायकवाड यांनी कामाकाज पाहिले.