ना. गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांचा महावितरणला इशारा
जळगाव – जिल्ह्यात महावितरणकडून सर्रासपणे नविन वीज मिटर कुठल्याही सुचनेविना बसविले जात आहे. नविन वीज मिटर बसविल्यामुळे नागरीकांना हजारो रूपयांची बिले येत आहेत. कुठलाही आदेश नसतांना जुने मीटर काढून नविन बसविले जात आहे. नागरीकांमधुन याबाबत तीव्र संताप असुन यापुढे नविन वीज मिटर बसविल्यास महावितरणच्या अधिकार्यांना कार्यालयात बसू देणार नाही अशा इशारा शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिला. दरम्यान जिल्हा परीषदेचा अखर्चित निधी, पाणी पुरवठ्याच्या योजनांची दुरूस्ती आणि वाळु तस्करीवरून जिल्हा नियोजन समितीची सभा आज चांगलीच गाजली.
जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा ना. उज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, प्रभारी जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा परीषद सीईओ बी.एन.पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, मनपा आयुक्त उदय टेकाळे आदी उपस्थित होते.
महावितरणचे अधिकारी धारेवर
जिल्ह्यात जुने वीज मिटर काढून नविन वीज मिटर बसविण्याची मोहीम सुरू आहे. मात्र या नविन मिटरमुळे नागरीकांना हजारो रूपयांची बिले येत असल्याने सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांनी महावितरणच्या अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच पाचोरा तालुक्यासाठी २२ ट्रान्सफार्मर्सची मागणी नोंदवूनही ते मिळत नसल्याने आमदार किशोर पाटील यांनी संताप व्यक्त केला. यावेळी नविन वीज मिटर बसविल्यास अधिकार्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा देण्यात आला.
परत गेलेल्या निधीवरून सदस्य आक्रमक
बैठकीच्या सुरवातीलाच जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी अखर्चित आणि समर्पित निधीचा आढावा सादर केला. यात तब्बल ३१ कोटी रूपयांचा निधी शासनाला परत करण्याची नामुष्की यंत्रणांवर आल्याचे त्यांनी सांगितले. या परत गेलेल्या निधीवरून माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, ना. गिरीश महाजन यांच्यासह सर्वच लोकप्रतिनीधींनी अधिकार्यांना धारेवर धरले. यापुढे निधी परत जाता कामा नये असा इशारा पालकमंत्री ना. महाजन यांनी दिला.
वाळु साठ्यांच्या चौकशीचे आदेश
शहरासह जिल्ह्यात वाळुची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचा मुद्दा आमदार चंदुलाल पटेल यांनी उपस्थित केला. प्रशासनाकडुन आजपर्यंत किती ठिकाणी कारवाई करण्यात आली? असा प्रश्न त्यांनी मांडला. त्यावर प्रभारी जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अवैध वाळु वाहतुकीबाबत केलेल्या कारवाईचा पाढाच वाचला. दरम्यान माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी देखिल वाळु तस्करीबाबत आतापर्यंत किती जणांना मोका लावण्यात आला असा प्रश्न मांडला. जिल्ह्यात वाळु तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असुन प्रशासनाकडुन मात्र हवी तेवढी कारवाई होत नसल्याचे आमदारांनी सांगितले. त्यावर पालकमंत्री ना. महाजन यांनी जिल्ह्यात ज्याठिकाणी अवैध वाळु साठा आहे अशा सर्व ठिकाणी चौकशी करून तो जप्त करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकार्यांना दिले. तसेच जप्त वाळु घरकुलांच्या कामासाठी उपलब्ध करून देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.
पाणी पुरवठा योजनांच्या दुरूस्तीसाठी निधी द्या
जिल्ह्यात कोल्हापूर बंधारे, पाणी पुरवठा योजना नादुरूस्त आहेत. या योजनांच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हा परीषद सदस्या प्रा.डॉ. निलीमा पाटील यांनी केली. तसेच वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांडपाणी हे भोगावती नदीत सोडून नदी प्रदुषीत करणार्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली.
अमृतचे काम रखडले
भुसावळ शहरात अमृत योजना मंजूर आहे. त्याचे काम देखिल सुरू झाले होते. मात्र आता ते काम बंद असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सभेत सांगितले. त्यावर पालकमंत्री यांनी ठेकेदारावर कारवाई करण्याचा अधिकार नगरपालिकेला असुन संबंधीतांना नोटीस देण्याची सुचना ना. महाजन यांनी केली.
गिरणेतुन आवर्तन सोडा – आमदार किशोर पाटील
भडगाव आणि पाचोरा शहराला २० दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत आहे. गिरणा धरणात पाणी असुनही नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. पाचोरा आणि भडगावसाठी गिरणा धरणातुन आवर्तन सोडावे अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी केली. त्यावर ना. महाजन यांनी गिरणा धरणात अवघा ७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आता आवर्तन सोडल्यास पुढे अडचण निर्माण होईल. त्यामुळे पावसाची प्रतिक्षा करा असे ना. महाजन यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील क्रीडा संकुलांमध्ये अनैतिक कामे सुरू असुन या संकुलांची कामे निधीअभावी रखडली आहेत. त्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणीही आमदार किशोर पाटील यांनी केली.
जि.प. आरोग्य विभागातील निलेश पाटील यांच्या निलंबनाचे आदेश
जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडले असल्याचा मुद्दा जिल्हा परीषद सदस्य गोपाल चौधरी यांनी मांडला. पैसा असुनही कर्मचार्यांचे पगार केले जात नाही. तसेच या विभागातील कनिष्ठ सहायक निलेश पाटील हे नेहमी नशेत राहत असल्याची तक्रारही त्यांनी केली. त्यावर पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांनी गंभीर दखल घेत निलेश पाटील यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
वाघनगर, सावखेडावासीय पाण्यापासून वंचीतच – आमदार भोळे
गेल्या तीन वर्षापासून शहरातील वाघनगर, सावखेडा हा भाग पाण्यापासून वंचीत आहे. याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणीपुरवठा योजना मंजूर असुनही त्याठिकाणी काम होत नसल्याची तक्रार आमदार राजूमामा भोळे यांनी मांडली.
जिल्हा नियोजन समितीच्या चर्चेत जिल्हा परीषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, रविंद्र पाटील, नाना महाजन, जयश्री पाटील, हिरालाल महाजन, पद्माकर महाजन यांनी सहभाग घेतला.
सभेतील ठळक मुद्दे
- जिल्ह्यातील नदीजोड प्रकल्पासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १० ते १५ कोटी रुपयांची तरतुद करणार
- गिरणा नदीवरील बलून बंधार्यांची निविदा आचारसंहितेपूर्वी काढण्यात येणार
- येत्या काळात जिल्हृयात ३५०० शेततळी बांधण्यात येणार
- गावांमध्ये बांधण्यात येणार्या व्यायामशाळांसाठी नियोजन समितीमार्फत ५ लाख रुपये निधी देणार
- जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसुल व पोलीस विभागाने संयुक्त मोहिम राबवावी
- जप्त केलेली वाळू घरकुलांसाठी मोफत देण्यात येणार
- मुबलक पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना सुरुच राहणार
- जिल्ह्यातील वीज मीटर बदलण्याची मोहिम थांबविण्यात येणार