अधिकार्‍यांनो पाणी द्या, नाहीतर राजीनामे द्या !

0

नगरसेवक डोळस यांनी केली मागणी

पिंपरी : नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी आम्ही भांडत आहोत. अधिकारी केवळ तांत्रिक अडचण असल्याची कारणे देतात. अभियंत्यांना तांत्रिक समस्या सोडविता येत नाहीत का? कामचुकार अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी. अधिकार्‍यांनो पाणी द्या, नाहीतर राजीनामे द्या, अशी आक्रमक भूमिका भाजपचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य विकास डोळस यांनी घेतली. तसेच नगररचना विभागातील अधिकार्‍यांची सहा महिन्यातून एकदा पाणीपुरवठा विभागात बदली करावी, असेही ते म्हणाले.  महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा शनिवारी सुरू आहे. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून गेल्या तीन तासापासून चर्चा सुरू होती.

नागरिक आंदोलन करतात

नगरसेवक विकास डोळस म्हणाले की, नागरिकांचे प्रश्‍न सुटत नाहीत याचे वाईट वाटते. दिघी, बोपखेल परिसरातील पाणी पुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून घरी येऊन आंदोलन करत आहेत. त्यामुळे घरातील लोकांना भिती वाटू लागली आहे. मोठ्या सोसायट्यांना नळ कनेक्शन कसे दिले जाते. सर्वसामान्य नागरिकांनाच केवळ विस्कळीत पाणी पुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेची क्षमता नसेल तर नवीन गृह प्रकल्पांना नळ कनेक्शन देण्यात येऊ नयेत. अधिकार्‍यांना पाणी पुरवठा विभाग शिक्षा वाटत असेल तर त्यांनी नोकरी सोडून घरी बसावे. नगररचना विभागातील अधिकार्‍यांची सहा महिन्यातून एकदा पाणीपुरवठा विभागात बदली करावी. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची आयुक्तांनी एकत्रित जबाबदारी घ्यावी आणि आयुक्तांचे काय करायचे ते त्यांनीच ठरवावे. परंतु, शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे.