अधिकार्‍यांसमोर पोलिस पित्याने मांडली व्यथा

0

जळगाव। अपघातात जखमी झालेल्या मुलीवर गणपती हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा करत निट उपचार न केल्यामुळे अपंगत्व आलेे. त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीसाठी हतबल झालेल्या पोलिस पित्याने अखेर मंगळवारी दुपारी 12.30 वाजता कुटूंबियांसह रामानंदनगर पोलिस स्टेशन गाठत पोलिस निरीक्षकांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडत आपली कैफियत मांडली. तर जखमी मुलगी ममता हिने पोलीस मला न्याय देऊ शकत नाहीत, माझा दोष नसताना मी वेदना सहन करत असल्याची खंत पोलिस निरीक्षकांकडे तिने व्यक्त केली.

काय आहे, प्रकरण..?
रामानंदनगर पोलिस ठाण्यात बदली होवून आलेले अनिल राजाराम तायडे हे अगोदर वाहतुक पोलिस म्हणुन कार्यरत होते. त्यावेळी अनिल तायडे हे मुलगी ममता (वय-15) सोबत दुचाकीवरून जात असतांना 29 जुलै 2015 रोजी महामार्गावर अपघात होवून दोघे जखमी झाले होते. हायवेलगत गणपती मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलमध्ये दोघांवर पोलिस प्लॅन अंतर्गत उपचार सुरु होते. दोन दिवसानंतर ममताला पायात संवेदनाच जाणवत नसल्याने तीने सांगीतले, डॉ. लिना पाटील यांनी तपासणी करुन पायावरील प्लास्टर कापले, तेव्हा पाय चौपट सुजून मोठा झाला होता. 31 जुलै 2015 रोजी पायाचे सिटीस्कॅन काढल्यावर..नसा चोकअप होवुन पाय कापण्याची वेळ आली. तातडीने उपाययोजना म्हणुन मुलीला नाशिक येथे हलवण्यात आले. वोक्हार्ट हॉस्पीटल मध्ये एकापाठोपाठ एक अशा सलग 5 शस्त्रक्रिया करून सडलेले मास हांडापासून वेगळे केले गेले, नसांना पुनर्जीवीत करण्यात आले. त्यानंतर अति विशेष उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले, तेथेही 3 शस्त्रक्रिया झाल्या. सलग दोन वर्षे वेदनांनी कण्हत असलेल्या ममताची आजही चालू शकेल अशी परिस्थीती नाही. किरकोळ अपघातांनतर चुकीचे उपचार केल्याने हे सर्व घडल्याचा आरोप पिडीतेसह तायडेंनी केला आहे.

ममताने मांडली आपली व्यथा…
शस्त्रक्रिया होवून देखील ममता हिला अजूनही चालता येत नाही. होणार्‍या वेदना आता असह्य होत आहेत, म्हणून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, या भावनेतून ती आज मंगळवारी रिक्षात बसून आईवडीलांसह रामानंदनगर पोलीस स्टेशनला दुपारी 12.30 वाजता ती आली होती. दोषीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तिने लावून धरली. पोलीसांनी तिची मनधरणी केली. तशी कारवाई करता येत नसेल तर आपणास लेखी द्यावे, मी नंतर न्यायालयात जाईल. असा मुद्दा मांडून तिने सगळयानां पेचात टाकले. तर अनिल तायडे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत मुलीला होत असलेल्या त्रासाबाबत सांगितले. अखेर पोलिस निरीक्षक बी.जी. रोहोम यांनी रिक्षाजवळ जाऊन ममता हिच्या भावना जाणून घेतल्या. पोलीस निश्चित कारवाई करतील, परंतु सिस्टीमप्रमाणे कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी दिला. दरम्यान मुलीस न्याय मिळावा यासाठी पोलीस अधिक्षक,आयजी यांच्याकडे मागणी निवेदन देण्यात आली आहेत. याचा गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. परंतु संबधीतांवर गुन्हा दाखल होत नसल्याबददल ममता हिने तिव्र शब्दात आज भावना व्यक्त केल्या. माझे वडील म्हणायला पोलीस आहेत, परंतु माझ्यासाठी काय उपयोग? मी पाय गमविला, आणि मरणप्राय वेदना भोगतेय. दोषींवर कारवाई का होत नाही? असा सवाल तिने केला.

अहवाल येताच कारवाई करू
तायडे यांचे प्रकरण मागील महिन्यातच आपल्यापर्यंत आले, तत्पुर्वी याची चौकशी वाहतुक निरीक्षक चंद्रकांत सरोदे करीत होते. वैद्यकीय सेवा कायद्यानुसार, उपचारात हलगर्जीपणा, निष्काळजी झाली किंवा चुकीचे उपचार केले याचा निर्णय जिल्हा वैद्यकीय समीती घेते, आपण या प्रकरणात 10 जुनला जिल्हा शल्यचिकीत्सकांना पत्र देवुन तायडेंच्या प्रकरणात तज्ञ समीतीचा अहवाल मागीतला आहे. त्यासाठी स्वत: निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांना भेटून विचारपुस केली, मात्र अभिप्राय प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त होताच शुन्य मिनिटात संबधीतांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल. शासकिय परिपत्रकानुसार अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत निर्णय घेऊ. उपचारातुन मुलीस अपंगत्व आले, परंतु गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावा हवा. याप्रकरणी पालक फौजदारी गुन्हा किंवा ग्राहकमंचामध्ये जाऊ शकतात असेही पो.निरीक्षक बापूसाहेब रोहम म्हणाले.