अधिकार नसतांनाही भोईटे गटाकडून कर्मचाऱ्याची बदली

0

संचालक मंडळालाच बदलीचे अधिकार

जळगाव: धर्मदाय उपायुक्त कार्यालयाच्या परिशिष्ट १ वरील संचालक मंडळालाच जिल्ह्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक शाळा संचलित संस्थेतील वैध संचालक मंडळ समजण्यात यावे असे आदेश देण्यात आलेले आहे. परिशिष्ट १ वरील संचालक मंडळालाच संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या तसेच संस्थेशी संबंधित कामाबाबत आदेश आणि शिफारशीचे अधिकार असेल असे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक शाळांना दिल्या आहेत. मात्र मराठा विद्या प्रसारक मंडळावरील भोईटे गटाच्या संचालक मंडळाने अधिकार नसतांनाही एका कर्मचाऱ्याची बदली केल्याचे समोर आले आहे. मराठा विद्या प्रसारक मंडळावरील कोणतेही संचालक मंडळ धर्मदाय उपायुक्त यांच्या परिशिष्ट १ वर नाही. यावरून शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली झाल्याचे उघड होते.

शिक्षणाधिकारी कारवाई करणार?

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव निलेश भोईटे यांच्या स्वाक्षरीने १४ डिसेंबर रोजी अध्यापक विद्यालयातील दिलीप भागवत जगताप (शिपाई) यांची विकास विद्यालय कळमसरे तालुका पाचोरा येथे बदली करण्यात आल्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. परंतु हे संचालक मंडळ परिशिष्ट १ वर नसल्याने त्यांना बदलीचे आदेश नाही, असे असतांनाही झालेल्या बदलीवरून शिक्षणाधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

७ डिसेंबर रोजी शिक्षणाधिकारी यांनी परिशिष्ट १ वरील संचालक मंडळ वैध समजण्यात यावे याबाबत आदेश दिले होते. त्यानुषंगाने शिक्षणाधिकारी यांनी मराठा विद्याप्रसारक मंडळावरील कोणतेही संचालक मंडळ परिशिष्ट १ वर नसल्याने कोणत्या संचालक मंडळाला बदली आणि इतर कामासंदर्भात आदेश देण्याचे अधिकार असावे याबाबत वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन मागविणार होते. मात्र याबाबत कोणतेही मार्गदर्शक सूचना नसतांनाही संचालक मंडळाने एका चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्याची बदली केली आहे.