अधिकार नसताना प्रभारी लेखापालांच्या अडीच कोटींच्या बिलावर सह्या

0

जनआधार विकास पार्टीची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार ; चौकशीची मागणी

भुसावळ:- अधिकार नसताना पालिकेचे प्रभारी लेखापाल अख्तर खान खुशनूखान यांनी अडीच कोटी रुपयांच्या बिलावर स्वाक्षर्‍या केल्याची तक्रार जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे केली आहे. खान यांना खाजगी बिलावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार नसतानाही त्यांनी केलेला प्रकार गैर असल्याने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

पगारे यांनी 21 रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रारीनुसार खान यांच्याकडे केवळ प्रभारी लेखापालाचा पदभार आहे मात्र असे असतानाही कामाची शहानिशा न करता त्यांनी अडीच कोटी रुपयांची बिले काढली आहेत. संबंधित धनादेशावर मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर व नगराध्यक्ष रमण भोळे यांचीदेखील स्वाक्षरी असल्याने या प्रकाराची चौकशी करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, खान यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपल्यावरील आरोप निरर्थक आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी आपल्याला पूर्णवेळ लेखापाल म्हणून नियुक्त केले असल्याने चुकीचे काम करण्याचा प्रश्‍नच नाही, असे त्यांनी सांगितले.