भोपाळ: महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करणाऱ्या भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीय याला जामीन मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजविले आहे. भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना जामीन मिळाल्यावर त्यांच्या समर्थकांनी हवेत गोळीबार करुन आनंद साजरा केला. विशेष म्हणजे इंदूरमधील भाजपा कार्यालयासमोर हा प्रकार घडला. यावेळी विजयवर्गीय यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीदेखील केली. एक जण हातात बंदूक घेऊन हवेत गोळीबार करत होता. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
इंदूर महापालिकेचे अधिकारी धिरेंद्र बायस यांना बॅटने मारहाण केल्यामुळे भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना अटक झाली होती. मात्र शनिवारी भोपाळच्या विशेष न्यायालयाने 20-20 हजारांच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. याची माहिती मिळताच विजयवर्गीय यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली. त्याच्यासमोर विजयवर्गीय यांचे समर्थक भाजपाचा झेंडा घेऊन नाचताना दिसत आहेत. याशिवाय काहीजण रस्त्यावर फटाक्यांची माळ पेटवत आहेत.