मुक्ताईनगर – तहसील कार्यालयात विनापरवानगीने प्रवेश करून तहसील कार्यालयातील व्हिडिओ चित्रीकरण करून गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी अनधिकृतरीत्या व्हॉट्सअॅप व फेसबुकसारख्या सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मुक्ताईनगरचे माजी उपसरपंच आसीफ बागवान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तहसील कार्यालयाच्या लिपिक ज्योती निवृत्ती पाटील (35) यांनी या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात फिर्याद दिली. 11 फेबु्रवारी रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास माजी उपसरपंच आसीफ बागवान यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात प्रवेश करत तहसीलदार दालन व नायब तहसीलदार कार्यालयातील दालनाचे व्हिडिओ चित्रीकरण केले.व्हिडिओ चित्रीकरणासाठी कोणतीही रितसर परवानगी न घेता गोपनीयतेचा भंग केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. चित्रीकरण केलेला व्हिडिओ व्हॉट्सअॅप व फेसबुकसारख्या सोशल मीडियावर टाकून कार्यालयीन गोपनीयतेचा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीसनिरीक्षक अशोक कडलग करीत आहेत.