भुसावळ । राज्यातील शेतकर्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सन 2022 पर्यंत शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण शासनाने राबवले आहे. तसेच परिसरात पाऊस लांबल्याने अजूहनी बहुतांश शेतकर्यांच्या पेरण्या बाकी असून कापसाचे अधिक उत्पन्न देणार्या वाणांवर बंदी घालण्यात आल्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्यांना चांगल्या प्रतीच्या बियाण्यांसाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
पर्यायी बियाणे उपलब्ध करुन द्यावे
बागायती कापसाच्या 24 वाणांवर राज्य शासनाने बंदी लादली. मुळात अधिक उत्पन्न देणार्या बहुतांश वाणांचाही यात समावेश असल्याने शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. बंदी लादल्यानंतर सरकारने पर्यायी बियाणे बाजारपेठेत उपलब्ध करुन दिले नसल्याने शेतकर्यांमधून संताप व्यक्त होत आहे. यापुर्वी लागवड केलेल्या वाणांच्या उत्पन्नाचा शेतकर्यांचा अंदाज होता. मात्र आता हे वाण बंद झाल्याने आता नवीन वाण कोणते घ्यावे असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या बाजारात कमी प्रमाणात कापसाचे बियाणे उपलब्ध आहे. मात्र मागणी वाढून पुरवठा कमी असल्याने चढ्या भावाने विक्री आणि काळाबाजारात विक्री होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शासनाने हे वाण बाजारात उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
वेळेत बियाणे द्या
शासनाने कापूस आणि मका यांचे अधिक उत्पन्न देणारे वाण बंद केले. या वाणांबाबत शेतकर्यांच्या तक्रारी नसल्याने या वाणांवरील बंदी उठवावी. यामुळे बियाणे वेळेत उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी.
या वाणांना मागणी
बीटी अंकूर सिड्स, नागपूर 3049, नॉनबिटी बायर आर, सिताज 317, सला अॅग्रो एससीएच22, सोलर अॅग्रोटेक चे सुरत श्रीकांत, झायलम सिड्स, हैद्राबाद एनएचपीएल 999, रामा अॅग्रो नेनेटीक, एसआरसीएच 55, नुजीवीडू, आकेला एससीएच 108, कावेर सिड्स केसीएचएच 8152 भुसावळ विभागात सर्वाधिक प्रसिध्द असलेल्या बंपर उत्पन्न देणार्या राशी 659 आदी 24 वाणांवर बंदी लादण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कापूसवाण बंदीमुळे अनेक शेतकरी आता कापसाऐवजी इतर पर्यायी पिकांकडे वळण्याच्या तयारीत आहेत. बंदी लादलेल्या राशी या वाणातून भुसावळ विभागातील शेतकर्यांना अधिक उत्पन्न मिळाले होते. यामुळे किमान जिल्हाभरात राशी 659 हे वाण उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकर्यांमधून वाढत आहे.