मुंबई:- अधिवेशनाच्या काळात विभागवार चर्चेच्या वेळी त्या विभागांचे सचिव अनुपस्थित असतात. यापुढे अशा चर्चेच्या वेळी त्या-त्या विभागांच्या सचिवांची उपस्थिती बंधनकारक केली जाणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली. महत्वाच्या चर्चेच्या वेळी समन्वयाच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 24 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनात ह्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल, असेही बापट यांनी सांगितले. मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
-कामाच्या सुलभतेसाठी आमदारांच्या पीएना प्रशिक्षण!
जनतेचे सेवक म्हणून आमदार प्रतिनिधित्व करत असतात. मात्र त्यांचे स्वीय सहायक अर्थात पीए आमदारांची ‘रीड की हड्डी’ असतात. मतदारसंघातील समस्यांपासून ते मंत्रालयातील महत्वाच्या कामकाजासंबंधी कागदपत्रे आणि निवेदनांवर कार्यवाही करण्यात या सहायकांचा मोलाचा वाटा असतो. मात्र या स्वीय सहायकांना कामकाजातील अनेक बाबींची माहिती नसते, त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते. ना. गिरीश बापट यांनी यावर उपाय म्हणून या सर्व स्वीय सहायकांना प्रशिक्षण देणार असल्याची माहिती दिली. 23 जुलै रोजी 6 तासांचे प्रशिक्षण मंत्रालयात आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कामकाजात सुटसुटीतपणा यावा यासाठी भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन त्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.