पोलिसांनी दिला अहवाल; विधानभवनाची सुरक्षा वाढविली
मुंबई:- सरकारी व्यवस्थेमध्ये आपली कामे होत नसल्याने लोकांची नाराजी मंत्रालयात येऊन पोहोचली. मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्यांप्रमाणेच ऐन अधिवेशन काळात विधानभवन परिसरातही अशाच घटना घडण्याची शक्यता पोलिसांनी आपल्या अहवालात नोंदविली असून त्यामुळे विधानभवनात पोलीस सुरक्षा वाढविण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली आहे. विधानभवनाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ होण्यासंदर्भात या आधीही जनशक्तिने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताला या माहितीमुळे दुजोरा मिळाला आहे. मंत्रालयात आत्महत्या आणि आत्महत्यांचे प्रयत्न झाल्याने राज्य सरकारवर विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला आहे. मंत्रालयात येऊन आत्महत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी येथे येणाऱ्या नागरिकांची कसुन तपासणी केली जात आहे. तसेच, मंत्रालयात विविध ठिकाणी जाळ्याही बसविण्यात आल्या आहेत. मंत्रालयात झालेल्या घटनांची पुनरावृत्ती मंत्रालयातही होऊ नये यासाठी पुरेपूर खबरदारी घेण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
पत्रकारांनाही बसला सुरक्षा व्यवस्थेचा फटका
विधानभवनाकडे जाणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येथे प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे ओळखपत्र कसून तपासले जात आहे. या कसून तपासणीचा फटका अनेक पत्रकारांनाही बसला. पत्रकारांना दिलेल्या ओळखपत्रावर विधानभवनाचे सचिव अनंत कळसे यांची सही अस्पष्ट असल्याने कारण पुढे करत पत्रकारांना विधान भवनात जाण्यास मज्जाव करण्यात आला. आयनॉक्स सिनेमागृहाजवळील विधानभवनाच्या कोपऱ्यावरील अधिकृत खादयपदार्थांचा स्टॉल आणि अन्य स्टॉल बंद करण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
नाव नसलेल्या ओळखपत्रांचा गठ्ठा पकडला
याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अधिवेशन काळात ८ ते १० आत्महत्यांचे प्रयत्न होण्याची शक्यता असल्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. कोणीही बाहेर काही खाऊन आत आला तरी त्यामुळे विधिमंडळाचीच बदनामी होणार आहे. प्रवेशद्वाराच्या समोर जरी कोणी काही केले तरी ते विधानभवनात झाले असेच म्हटले जाऊ शकते त्यामुळे बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राजू शेट्टी यांचे आंदोलन लक्षात आहे. दोन-दोन, तीन-तीन च्या गटाने ही माणसे आत येतात आणि अचानक आंदोलन करतात. सोमवारी रात्री १०० च्या आसपास नाव नसलेल्या ओळखपत्रांचा गठ्ठा पकडण्यात आला असून त्याची चौकशी सुरु आहे. त्या ओळखपत्राचा वापर करून कोणीही विधानभवनात प्रवेश करू शकला असता. त्यामुळे तसे काही होऊ नये यासाठी विधानभवनात प्रवेश करणाऱ्यांचे ओळखपत्र काटेकोरपणे तपासत असल्याचे ते म्हणाले.