अधिवेशन संपताच मेहता, देसाईंना आले नैतिकतेचे भान!

0

मुंबई । भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर अडचणीत आलेल्या गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना विधिमंडळ अधिवेशन संपताच दुसर्‍या दिवशी अंतरात्म्याने कौल दिला, दोघांना नैतिकता आठवली आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पदाचे राजीनामे दिले. संपूर्ण अधिवेशन काळात विरोधक नैतिकतेच्या आधारावर दोघांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेल्या आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोपानंतर त्यांनी राजीनामा देताच तो चटकन स्वीकारून मोकळ्या होणार्‍या मुख्यमंत्र्यांनी मेहता, देसाईंवर मात्र ’विशेष मेहरबानी’ दाखविली. दोघांनी दिलेले राजीनामे फडणवीस यांनी, नको कशाला; राहू द्या की … नंतर बघू, असे म्हणत फेटाळून लावले. चौकशी होणार आहे, अहवाल येऊ द्या, राजीनामा देण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दावा देसाई, मेहतांनी केला. या राजीनाम्याच्या लुटूपुटूच्या खेळामुळे विरोधक संतप्त झाले आहेत. हा पारदर्शकतेचा दावा करणार्‍या फडणवीस सरकारचा ’रडीचा डाव’ असल्याची टीका काँग्रेस-राष्ट्रवादीने केली आहे. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशी ही जनतेशी विश्वासघात करणारी नौटंकी असल्याचे विरोधकांनी म्हटले. देसाई, मेहतांना एक न्याय व खडसेंना वेगळा न्याय हे पाहता, खडसे यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी केवळ राजकीय उट्टे काढले होते, हे ही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देसाई यांची पाठराखण केली आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लोकांनी मागितला म्हणून राजीनामा कशाला द्यायचा, असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राजीनाम्याची तयारी दाखवली होती. पण या प्रकरणाची चौकशी होणार आहे. राजीनाम्याची गरज नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला.
– प्रकाश मेहता

राजीनाम्याची आवश्यकता नाही. मी राजीनामा स्वीकारणार नाही. नि:ष्पक्ष चौकशी होईल. चौकशीअंती येणार्‍या अहवालाचा निष्कर्ष योग्यवेळी पाहू.
– सुभाष देसाई

शिवसेना सुभाष देसाई यांच्या पाठीशी
शिवसेना सुभाष देसाई यांच्या पाठीशी आहे, असे सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देसाईंची पाठराखण केली. विरोधकांच्या मागणीनंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजीनाम्याच्या तयारी दाखवली. त्यावर उद्धव ठाकरेंनी पक्षाचा देसाईंना पाठिंबा असल्याचे सांगितले. एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप करत विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर देसाईंनी राज्यानाम्याची तयारी दर्शवली. मात्र राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे देसाई म्हणाले.