मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीवरून भाजपकडून शिवसेनेची कोंडी करण्याला सुरुवात झाली आहे. आज सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाचा प्रस्ताव आणून ठराव करण्याची मागणी भाजपने केली आहे. मात्र विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. नियमावर बोट ठेवून विधानसभा अध्यक्षांनी सावरकर गौरव प्रस्ताव फेटाळला. यावरून भाजपने सभागृहात जोरदार गदारोळ केला. कॉंग्रेसच्या मुखपत्रातून सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. या मुखपत्रावर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपच्या सदस्यांनी सभागृहात फलक झळकावून केला निषेध केला.
भाजपची सत्ता असताना का दिले नाही?: अजित पवारांचा सवाल
केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ का दिले गेले नाही असा सवाल राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केला. सावरकरांच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांना नेमका काय स्वार्थ साधायचा आहे हेच कळत नाही असेही अजित पवारांनी सांगितले.