दौंड । दौंड तालुका भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षपदी किरण लक्ष्मण शिंदे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. शिंदे यांना निवडीचे पत्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नामदेव ताकवणे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, सरचिटणिस सचिन सदावर्ते, दौंड तालुका अध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे यांच्यासह आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे या बोरीपार्धी येथील रहिवासी असून त्यांनी निराधार महिलांना शासनाचे संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देणे, महिला बचत गटाच्या माध्यमातून गरजू महिलांना आर्थिक मदत मिळवून देण्याबरोबरच विविध शासकीय योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले आहे. महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांचे संघटन करुन महिलांना त्यांचे हक्क, आर्थिक स्वावलंबी करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.