अध्यक्षांनी कर्मचार्‍यांना धरले धारेवर

0

पुणे । अधिकार्‍यांच्या गैरहजेरीमुळे तहकुब झालेली जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी पार पडली. बैठकीच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी तहकूब झालेल्या बैठकीचा धागा पकडत संबधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे काहीवेळ सभेचे वातावरण तापले होते. दरम्यान, या बैठकीला खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, प्राथमिक शिक्षणाधिकारी शैलेजा दराडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, छोटे पाटबंधारे कार्यकारी अभियंता व्ही. एस. आवटे गैरहजर राहिले होते.

जिल्ह्यातील विविध कामांचा आराखडा आणि कामांना आर्थिक मंजुरीविषयी नियोजन करण्यासाठी स्थायी समितीची बैठक आयोजित केली जाते. त्या बैठकीची तारीख आणि वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य यांना कळविली जाते. यासाठी पत्रव्यवहार करण्यात येतो. त्यानुसार 1 सप्टेंबर 2017 रोजी बोलवण्यात आलेल्या बैठकीला अनेक अधिकार्‍यांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे अध्यक्षांना बैठक तहकूब करावी लागली होती. बैठकीला गैरहजर असणार्‍यांना नोटीस काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे केली. दरम्यान, बैठकीच्या या सुरुवातीलाच अध्यक्षांनी गैरहजर अधिकार्‍यांना झापल्यामुळे सभेत शांतता पसरली होती. तर सलग तीन बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई अनुपस्थित राहिल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विविध कामांचा आढावा घेण्यास सुरुवात झाली.