मुंबई: काल राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत ६ मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. आज ते विधान भवनात जाऊन पदभार स्वीकारतील. तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला आहे. या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलविण्याचा निर्णय का घेण्यात आला?, नियमबाह्य पद्धतीने अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी?, स्वत:च्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? त्यांना का डांबून ठेवले आहे? असे प्रश्न फडणवीस यांनी केले आहे.
या प्रश्नांचे उत्तर महाराष्ट्राला हवे आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारला धारेवर धरले आहे. उद्या अधिवेशन बोलविण्यात येणार असून त्यात अध्यक्ष निवड होणार आहे. मात्र अध्यक्ष निवड कशासाठी हा प्रश्न देवेद्र फडणवीस यांनी केला आहे.