अध्ययन-अध्यापन पध्दतीत बदल करा

0

जळगाव। उच्च शिक्षणात कौशल्य विकास हा शिक्षणाचा मुख्य गाभा असायला हवा आणि यासाठी अध्ययन-अध्यापन पध्दतीत बदल करावे लागतील आणि या बदलांना सामोरे जाण्याची तयारी शिक्षकांना ठेवावी लागेल, असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.पंडित विद्यासागर यांनी केले. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 27 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शनिवार 12 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यगौरव पुरस्कार सोहळयात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, विशेष कार्य अधिकारी प्रा.पी.पी.माहुलीकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.डी.एन.गुजराथी, वित्त व लेखाधिकारी डॉ.बी.डी.कज्हाड उपस्थित होते.

कार्यगौरव सोहळ्यानंतर प्रा.संजय पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यामध्ये भालचंद्र सामुद्रे, सरस्वती बारी, पुनम विसपूते, अंजली कुलकर्णी, संजय पत्की, अमृत दाभाडे, किशोर राजपूत, जितेंद्र गोहिल, गोपाल ठाकरे आदींनी भाग घेतला. केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगा डान्स सादर केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी यांनी केला.

कौशल्य विकास हा शिक्षणाचा मुख्य गाभा असावा
प्रा.पंडित विद्यासागर पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून उच्च शिक्षण संक्रमणावस्थेत जात आहे. आपल्या शिक्षण पध्दतीमध्ये कृतीशीलता नाही. ही पध्दती कौशल्यावर आधारित नाही. प्राथमिक स्तरापासून पदवीपर्यंत विद्यार्थी नवे प्रयोग करीत नाही. त्यामुळे नोकरी-व्यवसायात त्यांना स्थिर व्हायला कालावधी लागतो. या द्विधावस्थेतून बाहेर पडायचे असेल तर कौशल्य विकास हा मुख्य गाभा असायला हवा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. नव्या विद्यापीठ कायद्यात चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांना आपल्या शिकविण्याच्या पध्दतीमध्ये बदल करावे लागतील. आपल्या उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले पाहिजे तसे मापदंड गाठण्याचे उद्दिष्ट ठेवायला हवे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अनुकूल असलेली सर्व परिस्थिती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आहे. या विद्यापीठाला चांगली परंपरा आहे. उत्तम शिक्षक, चांगले संशोधक, चांगले प्रशासकीय कर्मचारी लाभल्यामुळे या विद्यापीठाचे भवितव्य उत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुणवत्तेचे केंद्र छोट्या शहराकडे
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेतला. आपल्या मुलाला चांगल्या महाविद्यालयात अथवा विद्यापीठात शिक्षण मिळावे असे प्रत्येक आई-वडीलांचे स्वप्न असते. या सगळया सुविधा आपल्या महाविद्यालयातही देण्यासाठी संस्थाचालक, प्राचार्य यांनी प्रयत्न करायला हवे. आता गुणवत्तेची केंद्रे मोठया महानगरात नसून जळगाव सारख्या शहराकडे सरकू लागल्यामुळे आपल्या सगळयांची जबाबदारी वाढली असल्याचेही कुलगुरु प्रा.पाटील म्हणाले. प्रारंभी प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी प्रास्ताविक केले. या समारंभात उमवि अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. सुत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी आणि डॉ.आशुतोष पाटील यांनी केले. उमवि अ‍ॅप तयार करणारे हुसेन दाऊदी, प्रा. मनोज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

पुरस्कार वितरण: उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार – झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय, धुळे, उत्तेजनार्थ-आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड महाविद्यालय, शेंदूर्णी उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार – प्रा.डॉ.ज्ञानेश्वर सुर्यवंशी, विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे उत्तेजनार्थ- डॉ.प्रमोद पवार, धनदाईमाता एज्यु.सो.चे कला महाविद्यालय, अमळनेर उत्कृष्ट शिक्षक (महाविद्यालयीन) पुरस्कार डॉ.भटा चौधरी, झेड.बी.पाटील महाविद्यालय, धुळे , प्रा.जयप्रकाश चौधरी, मु.जे.महाविद्यालय, उत्कृष्ट शिक्षक (विद्यापीठ आस्थापना) पुरस्कार – प्रा.विलास पाटील, यु.आय.सी.टी.,उमवि उत्कृष्ट अधिकारी (वर्ग-1 विद्यापीठ आस्थापना) पुरस्कार – 1) डॉ.राजेश वळवी, उपकुलसचिव, विद्यापीठ विकास व संशोधन विभाग,उमवि 2) हुसेन दाऊदी, पध्दती विश्लेषक, संगणकशास्त्र प्रशाळा उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी (वर्ग-3 विद्यापीठ आस्थापना) पुरस्कार – अनिल सुर्यवंशी, वरिष्ठ सहायक, परीक्षा विभाग, मीच्छद्र पाटील, सहायक, संलग्नता विभाग,भिमसिंग जाधव, सहायक कक्षाधिकारी, प्रशासन विभाग, मृणालिनी चव्हाण, सहायक, प्रशासन विभाग, उमवि, मधुकर वाघ, वाहन चालक, उमवि शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार (विद्यापीठ आस्थापना वर्ग- 4) संजय पवार ,शिपाई, परीक्षा विभाग, प्रकाश पाटील, शिपाई, सभा व दप्तर विभाग, उमवि कंत्राटी कर्मचारी- गुलाब पाटील शिक्षकेतर कर्मचारी (वर्ग 2 व 3 महाविद्यालयीन) पुरस्कार- मुरलीधर धांडे, कुलसचिव, जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी (वर्ग 4 – महाविद्यालयीन) पुरस्कार -भरत पाटील, प्रयोगशाळा परिचर, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा, विष्णू शेटे, शिपाई, धनदाईमाता महाविद्यालय, अमळनेर संशोधन निधी पुरस्कार- प्रा.पी.पी.माहुलीकर, डॉ.व्ही.व्ही.गिते, प्रा.आर.डी.कुलकर्णी, प्रा.डी.जी.हुंडीवाले शोधनिबंध पुरस्कार- प्रा.एस.टी.इंगळे, पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळा,प्रा.सत्येंद्र मिश्र, विद्यापीठ रासायनिक तंत्रशास्त्र संस्था, डॉ.जे.बी.नाईक,विद्यापीठ रासायनिक तंत्रशास्त्र संस्था, प्रा.रत्नमाला बेंद्रे, रासायनिकशास्त्र प्रशाळा, प्रा.ए.जी.इंगळे, जौवशास्त्र प्रशाळा,डॉ.विकास गिते, रासायनिकशास्त्र प्रशाळा,डॉ.दीपक दलाल, रासायनिकशास्त्र प्रशाळा, डॉ.सतीश पाटील, जौवशास्त्र प्रशाळा,डॉ.पी.जी.चव्हाण, भौतिकीयेशास्त्र प्रशाळा, स्वामीत्व हक्क (पेटंट) पुरस्कार- प्रा.सत्येंद्र मिश्र, विद्यापीठ रासायनिक तंत्रशास्त्र संस्था.

ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया
आशियन योगा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या तनय मल्हारा आणि केंद्रीय विद्यालयातील जय पाटील, भारद्वाज पाटील, ईश्वर शिरुळे, सृष्टी थोरात, दीपाली महाले या पाच विद्यार्थ्यांची राष्ट्रीय योगा क्रीडा स्पर्धेत निवड झाल्याबद्दल आणि या सगळया विद्यार्थ्यांचा व योग शिक्षिका अनिता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. एम.एस्सी.ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यावर्षापासून पहिल्यांदा राबवून यशस्वी करण्यात आली आहे. ही प्रकीया राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रा.समीर नारखेडे, प्रा.मनोज पाटील, हुसेन दाऊदी व अशोक शिंपी यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.