जळगाव। आध्यात्मिकतेशिवाय विज्ञान अपूर्ण असून विज्ञान आणि आध्यात्मिकता या दोघांमुळेच जगात सुख, शांती, सद्भावना आणि एकात्मता नांदेल, ज्ञान-विज्ञानाच्या संकल्पना सोप्या आणि सर्वसामान्यांच्या भाषेत सांगणे हे आध्यात्मवेत्ता आणि वैज्ञानिकांचे कर्तव्य आहे आणि यामुळेच आध्यात्मिकता आणि विज्ञानाचा समन्वय होऊन मूल्याधिष्ठीत समाजनिर्मिती घडेल असा आशावाद ब्रह्माकुमारीज्तर्फे आयोजित संशोधकांमध्ये आध्यात्मिकता विषयावरील कार्यशाळेत सहभागीं संशोधकांनी व्यक्त केला.
विविध विषर्यांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
स्प्रिच्युअल अॅप्लीकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर(स्पार्क), ब्रह्माकुमारीज् यांच्या मार्फत जैन अनुभूती इंटरनॅशनल स्कूलच्या अॅसेंब्ली सभागृहात संशोधकांसाठी राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली गेली. संशोधकांमध्ये आध्यात्मिकता आणि आध्यात्मिकतेमधील संशोधनाचा अनुबंध साधण्यासाठी देशभरातून संशोधक, अभ्यासक व आध्यात्मवेत्यांनी यात सहभाग नोंदविला. सुरुवातीस ब्र.कु.विद्या यांनी ब्रह्माकुमारी विद्यालयाचा परिचय दिला. प्रास्तविकात विनय पण्डया, गुजराथ यांनी स्पार्क प्रभागाबद्दल माहिती दिली. संमेलनाचा उद्देश ब्र.कु. श्रीकांत, मुख्यालय समन्वयक, स्पार्क प्रभाग माऊंट आबू यांनी स्पष्ट केला. ब्र.कु.वासंती, नाशिक आणि ब्र.कु. निलीमा बहन यांनी क्रियेटीव्ह मेडिटेशन सत्रात उपस्थितांना राजयोग अभ्यास करविला. ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, जळगाव उपक्षेत्रीय निर्देशिका यांनी आशीर्वचन संबोधन केले.
ब्र.कु. सुरजभाई, माऊंट आबू यांनी आपल्या ओजस्वी संबोधनात मानवी जीवन आणि आध्यात्मिकतेच्या सहसंबधावर प्रकाश टाकला. कार्यशाळेतील मुख्य संबोधन ब्र.कु. आंबिका, बंगरुळ, राष्ट्रीय समन्वयक, स्पार्क प्रभाग यांनी केले.
यांची होती उपस्थिती
त्या म्हणाल्या की, नेहमीचे तांत्रीक स्वरूपात जीवन न जगता जीवन जगण्याचा खरा आनंद हा अध्यात्म, कला, साहित्य, विज्ञान यांच्या अनुभवातून मिळतो. या सर्वांचा आनंद घेऊन वर्तमानात जीवन जगा. याप्रसंगी प्रा. सुरेश पांडे, प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख, नुतन मराठा महाविद्यालय, प्राचार्य डॉ. अजित वाघ, प्राचार्य, डॉ. ए.जी. पाटील, देवकर अभियांत्रिकी महाविदयालय यांच्या समवेत अध्यात्म, विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील संशोधक, अभ्यासक उपस्थित होते. ब्र.कु. रुपेश, माऊंट आबू यांनी सूत्रसंचलन तर आभार प्रदर्शन स्पार्क चाप्टर जळगावचे समन्वयक शांताराम पाटील यांनी केले.