बलात्कार करणार्यास फाशीची शिक्षा देण्याचा वटहुकूम
नवी दिल्ली : 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला रविवारी राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. केंद्र सरकारने पोक्सो कायद्यात सुधारणा करून शनिवारी यासंदर्भातील वटहुकूम काढला होता. कठुआ, सुरत आणि इंदूर या ठिकाणी लहान मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे सत्ताधारी भाजप पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे.
जनआक्रोश पाहून तातडीने निर्णय
केंद्र सरकारने नवीन अध्यादेशाला मंजुरी दिल्याने 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. 16 वर्षांपेक्षा मुलीवर बलात्कार केल्यास कमीत कमी 10 वर्ष ते 20 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दोषीला जन्मठेपेची शिक्षा देण्याची सुद्धा तरतूद या कायद्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या लंडन दौर्याहून परतल्यानंतर काही तासातच त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि या बैठकीत पोक्सो कायद्यात सुधारणा करून तसा वटहुकूम काढला. या वटहुकूमावर राष्ट्रपतींनी रविवारी शिक्कामोर्तब करत मंजूरी दिली. बलात्काराच्या घटनांनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. लोकांचा हा आक्रोश पाहून सत्ताधार्यांनी तातडीने कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्थिक अध्यादेशालाही मंजुरी
पोक्सोच्या अध्यादेशासह राष्ट्रपतींनी फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक 2018 या आर्थिक अध्यादेशाला सुद्धा मंजुरी दिली. बलात्काराच्या घटनेआधी देशात अनेक बँक घोटाळे उघडकीस आले होते. बँकेचे हजारो कोटी रुपये घेऊन विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखे लोक देश सोडून पळून गेले आहेत. कर्ज घेतल्यानंतर जे परदेशात पळून जातात आणि देशात परतण्यास नकार देतात अशा गुन्हेगारांना, अटक वॉरंट काढण्यात आले असेल अशा गुन्हेगारांना, तसेच ज्यांनी 100 कोटी रुपयांहून अधिक कर्जासाठी ज्यांचे नाव डिफॉल्टर्स यादीत नमूद असेल अशा गुन्हेगारांना या विधेयकातील तरतुदी लागू होणार आहेत.