अध्यापकांच्या पदोन्नतीसाठी केंद्रीय प्रकल्पाचे आयोजन

0

जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उन्नत अभिवृध्दी योजनेतील अध्यापकांच्या पदोन्नतीसाठी केंद्रीय प्रकल्पाचे आयोजन 4 सप्टेंबर पासून करण्यात आले आहे. आजपर्यंत हा प्रकल्प चालणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील अध्यापकांचे उन्नत अभिवृध्दी योजनेअंतर्गत स्टेज एक मधून स्टेज दोन (ग्रेड पे- 6000 मधून 7000) व स्टेज दोन मधून तीन (ग्रेड पे- 7000 मधून 8000) मध्ये जाण्याकरिता विद्यापीठाच्या केंद्रीय पध्दतीने पदोन्नतीची एकूण 323 प्रकरणे छाननी तथा मूल्यमापन समितीमार्फत तपासण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील अध्यापकांचे उन्नत अभिवृध्दी योजनेअंतर्गत पदोन्नतीची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे त्याची कार्यवाही लवकरात लवकर व्हावी अशी मागणी शिक्षक संघटना, प्राचार्य व संबंधित शिक्षकांकडून होत असे. विद्यापीठाने या बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून प्रकरणे लवकर मार्गी लागावेत यादृष्टीने या कार्यास गती दिली. पात्र शिक्षकांचे पदोन्नतीच्या प्रकरणावर कार्यवाही करण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर विद्यापीठामार्फत समिती देवून पुढील कार्यवाही केली जात आहे. परंतू प्रकरणांची संख्या पाहता अशा प्रकणांचा त्वरीत निपटारा करण्यासाठी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पध्दतीने एकाच दिवशी प्रकल्प घ्यावा असे ठरले व व कुलगुरुंनी गठित केलेल्या समितीच्या मार्गदर्शनाखाली समितीने सुचविलेल्या विविध बाबींचा समावेश करुन विद्यापीठाच्या व्याख्याता मान्यता विभागाने गेल्या तीन महिन्यापासून नियोजन करुन महाविद्यालयाच्या आयक्यूएसी समितीने पदोन्नतीसाठी शिफारस केलेल्या 26 विषयांसाठी 323 शिक्षकांची प्रकरणे तपासण्यास ठेवली आहेत. दररोज सकाळी 8.30 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत कामकाज चालले. सहसंचालक, उच्च शिक्षण, जळगाव, त्यांचे प्रतिनिधी व व्यवस्थापन परिषद सदस्य हे प्रकल्पाच्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहून कामकाजाचा आढावा घेवून मार्गदर्शन करीत आहेत.

खूप वर्षांचा प्रलंबित असलेला हा विद्यापीठ स्तरावर राबविण्यात आलेला सर्वात मोठा प्रकल्प होता. प्रकल्प यशस्वी होण्यासाठी कुलगुरु, प्र-कुलगुरु, कुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी, व्यवस्थापन परिषद सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, अधिसभा सदस्य तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिक्षक संघटना व प्राचार्यांनी समाधान व्यक्त केले आहे.