अध्यापक, कर्मचार्‍यांसाठी तक्रार निवारण समिती स्थापन

0

तीस दिवसांमध्ये अपिल दाखल करता येणार

पुणे : उच्च शिक्षण संचालनालयाच्या शासकीय कार्यालये व महाविद्यालये, शिक्षण संस्थांमधील अध्यापक व इतर कर्मचार्‍यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाने ‘तक्रार निवारण समिती’ स्थापन केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही समिती स्थापन केली असून यामुळे अध्यापक व इतर कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे.

महाविद्यालयातील अध्यापक व इतर कर्मचार्‍यांच्या अनेक तक्रारी असतात. त्या सोडविण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही. अनेकजण तक्रारी सोडविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करतात. यामुळे न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत आहे. अध्यापक व कर्मचारी संघटनांनी समिती गठित करण्याबाबत शासनाकडे मागणी केली होती. मात्र त्याची दखलच घेतली जात नव्हती. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर हा निर्णय झाला. यात न्यायालयाने तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. वर्ग 1 व 2 मधील अध्यापक व अधिकारी तसेच वर्ग 3 व 4 मधील कर्मचार्‍यांच्या तक्रारींवर कार्यवाहीसाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन केल्या आहेत. समितीत पाचजणांचा समावेश असणार आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी मनिषा किणी यांनी जारी केले आहेत.