अनंतनागमधील पोट निवडणूक रद्द

0

नवी दिल्ली । अनंतनाग येथे 25 मे रोजी होणारी पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. निवडणुकीसाठी काश्मीरमध्ये सध्या योग्य वातावरण नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असे आयोगाने म्हटले आहे. सोमवारी, पाकिस्तानी रेंजर्सनी सीमारेषा ओलांडून दोन भारतीय जवानांचे शिर कलम केले. तर, दुसरीकडे दहशतवाद्यांनी कॅश व्हॅनवर हल्ला केला. यात 5 पोलीस जवान शहीद झाले. बँकेचे दोन अधिकारीही मारले गेले.

काश्मीर सतत धुमसत आहे…
श्रीनगरमध्ये 9 एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान हिंसाचार भडकला होता. यात 8 जण मारले गेले होते. त्या दिवशी सीआरपीएफच्या जीपवर एका काश्मिरी युवकाला बांधल्याचे समोर आले होते. सीआरपीएफने तो पत्थरबाज असल्याचे म्हटले होते. सोबतच तसे केले नसते तर दगडफेक करणार्‍या जमावाने जवानांना लक्ष्य केले असते, असाही दावा पोलिसांनी केला होता. काश्मीर सध्या धुमसत आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईनंतर पुलवामा येथे शाळकरी मुलांनीही लष्करावर दगडफेक केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये बिघडलेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्या म्हणाल्या होत्या, की परिस्थिती सुधारण्यासाठी चर्चा होणे गरजेचे आहे.