अनधिकृतरीत्या गॅस रीफिलिंग : नंदुरबार शहरात 13 सिलिंडर जप्त

नंदुरबार : नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परीसरातील दोन दुकानात छापा टाकून 13 गॅस सिलेंडर जप्त करीत या दुकानांना सील लावण्यात आले. महसूल विभागाचे पुरवठा निरीक्षक रमेश वळवी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या दुकानांमध्ये अनधिकृतपणे घरगुती गॅस सिलेंडर रिफिलिंग करून त्याची बेकायदेशिर विक्री करीत असल्याची गुप्त माहिती नंदुरबार महसूल विभागाला मिळाली होती. गॅस सिलींडर, वजन काटे आणि गॅस भरणारी विद्युत मोटार असा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

वाढत्या तक्रारीनंतर कारवाई
शहरातील शास्त्री मार्केट जवळील गुड्डू गॅस रीपेरिंग व डिलक्स गॅस रीपेरिंग या दुकानात विविध कंपन्यांचे घरगुती गॅस सिलेंडर काळ्या बाजारात विक्रीसाठी आणि ग्राहकांना विक्री केले जाते होते. विविध कंपनीचे भरलेले गँस सिलेंडर यावेळी आढळून आले. यात इंडियन गॅस व एचपी गॅस या कंपनीचे एकुण 13 सिलेंडर आणि 3 इलेक्ट्रीक वजन काटे तसेच 1 गॅस भरणारी विद्युत मोटार असा मुद्देमाल हस्तगत करत दोन्ही दुकान सील करण्यात आले.

नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा
या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई महसूल विभागाचे पुरवठा निरीक्षक अधिकारी रमेश वळवी, पुरवठा निरीक्षक हर्षद नेरकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते, अनिल बढे, पांढारकर, विशाले मराठे, सादीक पठाण, दिलवर भिल, सुनील वाकडे यांनी केली.