नंदुरबार : शहरातील परवानाधारक व विनापरवानाधारक दारू विक्रेत्यांचा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. परवानाधारक बियर बार चालकांनी अनधिकृत दारू विक्री करणाऱ्या बिअर शॉपी, ढाबे, सोडा बाटली हातगाडी, हॉटेल यांच्या विरुद्ध वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नंदुरबार मधील बहुचर्चित दारूचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नंदुरबार या शहराच्या नावातच बार हा शब्द असल्याने जागोजागी बिअर बारची दुकाने आढळून येतात. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि शहिदांच्या बलिदानाने नावारूपाला आलेल्या नंदुरबार शहराला दारूचा कलंक लागलेला आहे. शहरात परवानाधारकच नव्हे तर विनापरवानाधारक बेकायदेशीर दारू विक्री करणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा फटका परवानाधारक बियर बार चालकांना बसत असल्याने त्यांनी आता अनधिकृत दारू विक्री बंद करण्यासाठी एल्गार पुकारला आहे. त्यामुळे दारू बंदीचा हा प्रश्न चांगलाच गाजणार असून पोलीस अधिकारी व दारूबंदी अधिकारी याप्रकरणी आता कोणती भूमिका घेतात याकडे नंदुरबार शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे.