नवी मुंबई । महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका स्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली असून समितीची अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करणे, निष्कासित करणे, स्थलांतरीत करणे याविषयी आढावा बैठक महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) अंकुश चव्हाण, उप आयुक्त (अतिक्रमण व परि-२) डॉ. अमरिश पटनिगीरे, उपआयुक्त (परि-१ व मालमत्ता) दादासाहेब चाबुकस्वार तसेच नगररचना विभागाचे अधिकारी, सर्व विभाग अधिकारी, सिडको, एम.आय.डी.सी., वन विभाग, वन विभाग (कांदळवन कक्ष), पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिका क्षेत्रामधील ५०१ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होणार असून त्यामध्ये सिडकोच्या जागेवर तब्बल ३७७ अनधिकृत धार्मिक स्थळे बांधण्यात आलेली आहेत.
१ महिन्यात हरकती मागवल्या
शासनाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर पर्यंत आहे. या बैठकीमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील महापालिकेच्या जागेवर १४, सिडकोच्या जागेवर ३१२ व नव्याने केलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आलेली ६५ अशी एकुण ३७७, एमआयडीसीच्या जागेवर १००, वन विभागाच्या जागेवर ०७, वन विभागाचे ०१, रेल्वेच्या जागेवरील ०२ अशी एकूण ५०१ अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत चर्चा करण्यात आली. नव्या सर्व्हेक्षणात आढळून आलेल्या ६५ धार्मिक स्थळांवर १ महिन्याच्या कालावधीत हरकती मागविण्याबाबत विचारविनीमय झाला.
शासकीय कार्यालये रडारवर
सिडकोकडील ३१२ व एम.आय.डी.सी. कडील १०० अनधिकृत धार्मिक स्थळांवर पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले.
शासकीय कार्यालये, पोलीस स्टेशनमधील अनधिकृत धार्मिक स्थळांवर महानगरपालिका विभाग कार्यालयांकडील यंत्रसामुग्री घेऊन निष्कासन कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालयाचे व शासनाचे आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवर विहित मुदतीत कार्यवाही न केल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राधिकरणाची राहील असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त तथा समिती अध्यक्ष डॉ. रामास्वामी एन. यांनी या बैठकीत दिले. यावेळी पालिकेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्तिीत होते.