नियमितीकरणासाठी केवळ दोन हजार लोक उत्सुक; अर्ज करण्याची मुदतवाढ संपली
शहरात केवळ 14 हजार 447 नळजोड अवैध
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अद्यापही 14 हजार 447 नळजोड अवैध असून पाच महिन्याच्या मुदतीत केवळ दोन हजार 298 लोकांनी नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी केवळ एक हजार 627 जणांचे अर्ज पाणीपुरवठा विभागाने मंजूर केले आहेत. अवैध नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज करण्याची मुदतवाढ संपली असून महापालिका आता फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या महिन्याभरापासून विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. शहरात अनधिकृत नळजोडचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळजोड केले आहेत. त्यामुळे पाण्याची गळती होती. तसेच दुषित पाणीपुरवठा देखील होतो. त्यासाठी महापालिकेने मे महिन्यापासून अनिधकृत नळजोडचे सर्वेक्षण सुरु केले होते. अनधिकृत नळजोड धारकांनी 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. यादरम्यान केवळ 2 हजार 298 नागरिकांनी नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी एक हजार 627 जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तथापि, नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नसल्याने पुन्हा 15 नोव्हेंबरपर्यंत नळजोड नियमित करण्यास मुदतवाढ दिली होती. आता ही मुदत संपली असून महापालिका फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे.
ह प्रभागात अधिक नळजोड
नव्याने निर्माण झालेल्या थेरगाव परिसरातील ‘ह’ प्रभागात सर्वाधिक म्हणजेच पाच हजार 767 अनधिकृत नळ नळजोड आहेत. तर, निगडी, प्राधिकरणाचा परिसर असलेल्या ‘अ’ प्रभागात सर्वाधिक कमी 209 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी नियमीत करण्यासाठी 21 जणांनी अर्ज केले असून संपूर्ण अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ‘ब’ प्रभागाच्या हद्दीत 2 हजार आठ नळजोड अनधिकृत असून त्यापैकी 577 नागरिकांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील 497 अर्ज मंजूर झाले आहेत.
‘क’ प्रभागाच्या हद्दीत दोन हजार 185 अनधिकृत नळजोड असून नियमित करण्यासाठी केवळ 161 जणांनी अर्ज केले आहेत. त्यातील 60 अर्ज मंजूर झाले. ‘ड’ प्रभागाच्या हद्दीत 486 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी 158 जणांनी नियमितीसाठी अर्ज केले होते. त्यातील 132 मंजूर झाले आहेत. ‘ई’ प्रभागात 967 अनधिकृत नळजोड असून 73 जणांनी अधिकृतसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 25 जणांचे अर्ज मंजूर केले आहेत. ‘फ’ प्रभागात एक हजार 722 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी नियमित करण्यासाठी 924 जणांनी अर्ज केले आहेत. त्यातील 731 मंजूर झाले आहेत.
42 अर्ज केले मंजूर
‘ग’ प्रभागाच्या हद्दीत एक हजार 103 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी 279 नागरिकांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील 119 अर्ज मंजूर झाले आहेत. तर, ‘ह’ प्रभागात सर्वाधिक पाच हजार 767 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी केवळ 105 जणांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील 42 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. शहरात एकूण 14 हजार 447 अनधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी केवळ दोन हजार 298 नागरिकांनी नियमित करण्यासाठी अर्ज केले असून त्यातील एक हजार 627 मंजूर करण्यात आले आहेत. नागरिकांचा नळजोड नियमित करण्यास अल्प प्रतिसाद मिळाला आहे.