जळगाव। प्रभाग समिती क्र. 2 मधील नागरिकाच्या मिळकतीत नळ संयोजन नसतांना त्याला पाणी पट्टी आकारण्यात आली होती. ती पाणी पट्टी निर्लेखित करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी सभेत ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. स्थायी सभा महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी नगररचनाकार के. पी. बागुल, नगरसचिव अनिल वानखेडे व्यासपीठावर उपस्थित होते. शहरात अनाधिकृत नळ संयोजन वाढले असून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी सभापतींकडे केली. शहरात अनाधिकृत नळ संयोजन असून प्रत्येक वार्डांत ढोबळ मानाने 50 नळ संयोजन अनाधिकृत असल्याचे मानल्यास 37 वार्डांत 37 लाखांचे नुकसान होत असल्याचे पृथ्वीराज सोनवणे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
पूर्वसूचना नसतांना कंटेनर जागेवरून हलविले
पृथ्वीराज सोनवणे यांनी त्यांच्या प्रभागातील कचरा कंटनेर कोणीतरी परवा उचलून नेले असल्याची तक्रार केली. त्यांनी याबाबत ड्रायव्हर, सफाई मक्तेदारांची माणसे तसेच आरोग्य निरीक्षक यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना याबाबत माहिती नव्हती. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असात यात गाडी नं. 9342 ही कंटनेर घेवून जातांना त्याना आढळून आली आहे. संबंधीत अधिकार्यांना न विचारताच कंटनेर उचलून नेले होते.
अनाधिकृत नळसंयोजनधारकांचे सर्व्हेक्षण करा
शहरातील अनाधिकृत नळ संयोजनधारकांवर कारवाई केली आहे का याची विचारणा सोनवणे यांनी केली असता पाणी पुरवठा अभियंता डी. एस. खडके यांनी मागील तीन वर्षांपासून अनाधिकृत नळ संयोजनधारक शोधले नसल्याची माहिती दिली. नळ संयोजन देण्याचे काम करीत असतांना जर अनाधिकृत नळ संयोजनधारक आढळल्यास त्याच्याकडून दंड वसूल करून ते नळ संयोजन नियमित करण्यात येत असल्याची माहिती ही श्री. खडसे यांनी सभागृहास दिली.
प्रभाग समिती क्र. 1 चे प्रभाग अधिकारी व्ही. ओ. सोनवणी यांनी शहरात बोअरींग, नळ संयोजन यांचे सर्व्हेक्षण सुरू असल्याची माहिती दिली. सभापती वर्षा खडके यांनी व्यावसायिक व घरगुती नळ संयोजनाची विचारणा श्री. सोनवणी यांना केली असता त्यांनी पुढील सभेत सविस्तर उत्तर देतो असे सांगितले. खाविआचे नितीन बरडे यांनी चारही प्रभागात किती मिळतीकती धारकांचे पाणी पट्टी आकारणी निर्लेखित करण्यात आली याची विचारणा करत नागरिकांना हेतुपुरस्कर त्रास दिला जात असल्याची तक्रार केली. चार ही प्रभाग अधिकार्यांनी लक्ष दिल्यास 2 कोटी रूपयांची वसुली होईल असे सांगितले.
कंटेनर प्रकरणी त्वरीत कार्यवाही व्हावी- सोनवणे
याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पृथ्वीराज सोनवणे यांनी केली. विना परवानगी कंटेनर उचलून नेण्याची घटना ही अत्यंत गंभीर असून या प्रकरणी त्वरीत कार्यवाही व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. याला उत्तर देतांना प्रभाग अधिकारी एच.एम. खान यांनी कृष्णा दुसाने या ड्रायव्हरने ते कंटनेर उचलून प्रभाग समिती क्र. 4 मध्ये पूर्व परवानगी न घेता ठेवल्याचे सभागृहात सांगितले. त्या ड्रायव्हर सक्त कारवाई करण्याचा अहवाल उपायुक्तांकडे दिला असल्याचे सभागृहाला सांगितले. पृथ्वीराज सोनवणे यांनी शहरातील प्रत्येक प्रभागांतील कंटनेरवर नंबर टाकून त्यावर ठिकाण लिहीण्याची सूचना केली. तसेच काही कंटनेर खराब झालेले आहेत म्हणून नीवन कंटनेर खरेदी करण्याची प्रक्रीया राबविण्यात यावी असे मत मांडले. दरम्यान, नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी प्रभाग समिती क्र. 3 मध्ये सफाई व्यवस्थित होत नसल्याने मक्तेदार परिश्रम महिला बचत गट यांचा ठेका रद्द करावा अशी सूचना मांडली.