पोलिसांची मोहीम : वाहनचालकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
हडपसर : हडपसरमधील वाहतूककोंडीने वाहनचालक व नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. रस्त्यांवर अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी कब्जा केल्याने वाहतूक कोंडीची समस्या जटील बनली होती. पालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पोलिसांनी दांडके हातात त्यांच्यावर धडक कारवाई केली. त्यामुळे वर्षानुवर्षे होत असलेले अतिक्रमण एका झटक्यात साफ झाले अन् वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या कारवाईत 54 अनाधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.
हडपसरचा रस्ता म्हटला की वाहनचालकांच्या अंगावर काटा येतो, कारण संपूर्ण रस्ते अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी व्यापले आहेत. पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही टाळाटाळ केली जाते. पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सुनील तांबे, शिवाजी शिंदे, प्रसाद लोणारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
…तर कडक कारवाई
रस्त्यावर अतिक्रमणे होत असल्याने वाहतूककोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्यातच रस्ते अपुरे पडत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. अतिक्रमण केले तर पुन्हा कडक कारवाई करण्यात येईल. सुनील तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर