जळगाव। महानगरपालिकेची परवानगी न घेता शहरातील मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे पोस्टर लावल्याप्रकरणी पेस क्लासेस चालकाविरूध्द अतिक्रमण अधीक्षक एच.एम.खान यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ व शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील टॉवर चौक ते कोर्ट चौक, आकाशवाणी चौक, शिवाजीनगर, ख्वॉजामिया चौक अशा महत्वपूर्ण चौकातील कचराकुंडी, डिपींवर तसेच दुभाजकांवर पेस आयआयटी मेडिकल मॅथ सेट या क्लासेसचे जाहिरात पोस्टर्स महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे लावण्यात आले आहे. यामुळे शहरासह परिसराचे विद्रूपीकरण होत असल्याने महानगर पालिका अतिक्रमण अधीक्षक एम.एच.खान यांच्या फिर्यादीवरून पेस क्लासेस चालकाविरुध्द मालमत्ता विद्रुपीकरण कायदा 1995 चे कलम 3 प्रमाणे शहर व जिल्हा पेठ पोलिस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील पुढील तपास सपोनि आशिष रोही, एएसआय अकबर शेख करीत आहेत.