अनधिकृत फलक हटवा

0

पदाधिकार्‍यांच्या आयुक्तांना सूचना

पिंपरी-चिंचवड : शहरातील व्यावसायीक दुकानांवर लावण्यात येणार्‍या फलकाचा आकारमान ठरला आहे. परंतु, याचे शहरातील दुकानदारांकडून पालन केले जात नाही. दुकानावर भले मोठे फलक लावले जातात. शहराचे विद्रुपीकरण करणारे फलक हटविण्याच्या सूचना, महापालिकेतील पदाधिकार्‍यांनी आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच शहरातील मुख्य चौकातील अतिक्रम हटविण्यात यावे, असेही बजावले आहे. अनधिकृत फलकांबाबत आयुक्त दालनात मंगळवारी बैठक झाली. बैठकीला महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अनधिकृत फलक काढण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करावे. त्यासाठी जेवढे पैसे लागतील ते प्रभाग स्तरावरील निधीतून खर्च करावेत. तसेच मुख्य चौकातील अतिक्रण हटविण्यात यावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे, महापौर काळजे यांनी सांगितले. अधिका-यांना अनधिकृत फलक काढण्यास गेल्यावर कोणी दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास अधिकार्‍यांनी संबंधित व्यक्तीच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करावा, असेही काळजे म्हणाले.