आकाशचिन्ह विभागाचा थंडा कारभार
पिंपरी-चिंचवड : शहराचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी अनधिकृत फ्लेक्स वर कारवाई कऱण्याचे काम स्थायी समितीने एका संस्थेला दिले होते. जानेवारी महिन्यामध्ये कोट्यावधी रूपयांची निविदा काढून अनधिकृत फ्लेक्स काढण्याचे काम संस्थेला देण्यात आले. मात्र या संस्थेने प्रारंभी तुटपुंज्या कारवाया करून काम सुरु झाल्याचे दर्शविले, मात्र स्थायीची नवीन कार्यकारिणी आल्यापासून या विभागाकडे दुर्लक्ष झाले. त्याचाच फायदा ठेका दिलेल्या संस्थेला झाला असून, फ्लेक्सवरील कारवाया थंडावल्याचे चित्र शहरामध्ये दिसून येत आहे. यासंदर्भात आकाशचिन्ह परवाना विभागाचे प्रमुख विजय खोराटे यांना माहिती विचारली असता, त्यांच्याकडून माहिती देण्यास टाळाटाळ कऱण्यात आली.
ठेकेदार संस्था बिनकामाची
मागील काही महिन्यांपूर्वी शहरातील अनधिकृत फ्लेक्समुळे नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिकेवर आंदोलन केले होते. त्यावर अनेक आरोप प्रत्यारोपाचे राजकारणही झाले. तुषार कामठे यांनी एका आऊटडोअर मिडीयाच्या ठेकेदाराला खंडणी मागितल्याचा आरोप एका ठेकेदाराने केला होता. त्यामुळे चुकीच्या आरोप करणार्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टला टाकण्याची मागणी सभागृहातील नगरसेवकांनी केला होता. त्यावर स्थायीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी शहरातील अनधिकृत फ्लेक्स हटविण्यासाठी गणेश एंटरप्रायजेस या संस्थेला काम दिले होते. यासाठी कोट्यावधी रूपयांची निविदा काढून काम देण्यात आले. सुरुवातीला फरांदे बिल्डर, दोन ते तीन शाळा यांच्या होर्डींगवर कारवाई करून जोरात काम केल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर आकाशचिन्ह विभागाकडून आणि संस्थेकडून अनधिकृत फ्लेक्सवरील कारवाई कऱण्याची मोहिमच थंडावली आहे.
अधिकार्यांची साथ
शहरामध्ये पिंपरी-चिंचवड तसेच पुण्यातील अनेक अनधिकृत होर्डींग उभे करणार्या कंपन्या आहेत. या कंपन्याना आकाशचिन्ह परवाना विभागातील अधिकार्यांची साथ आहे. त्यामुळे अनधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट वाढला आहे. यावरून अनेक स्थायी सभा आणि सवर्साधारण सभा गाजल्या आहेत. मात्र पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत होर्डींग उभारण्याचे काम थांबलेले नाही. आनंद पब्लिसिटी, सफल ग्रुप, यांच्यासह अनेक संस्थाचे अनधिकृत होर्डींग आहेत. मात्र याकडे विभागाचे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा सुरु आहे.
शहराचे विद्रुपीकरण थांबणार कधी?
राजकीय नेत्याचा वाढदिवस असो, किवा सराफी पेढ्या, हॅटेल व्यावसायिक, शाळा यांचे फ्लेक्स लावले जातात. या अनधिकृत फ्लेक्सच्या माध्यमातून लाखो रूपयांचा व्यवसाय या संस्था कमावताना दिसतात. मात्र त्यांच्या या अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. आकाशचिन्ह परवाना विभागावर आयुक्तांनी तसेच पदाधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.