पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्या पिंपरी-चिंचवड शहराचा बकालपणा वाढविणार्या अनधिकृत फ्लेक्सवर महापालिकेच्या वतीने सोमवार (दि.11)पासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय स्थायी समिती सभेत गुरूवारी (दि. 7) झाला होता. तसेच फ्लेक्सवर तत्काळ कारवाई न करणारे क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षकांना निलंबनाला सामोरे जावे लागेल, अशी सक्त ताकीदही आयुक्तांनी सभेत दिली होती. या पार्श्वभूमीवर होणार्या कारवाईकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रशासनाचा सतत ठेंगा
विद्यमान स्थायी समिती आठ महिन्यांपूर्वी अस्तित्वात आली. समितीच्या पहिल्या सभेपासून शहरातील अनधिकृत फ्लेक्सवर चर्चा केली जात आहे. जाहिरातबाजीतून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असताना अवघ्या काही लाखांवर समाधान मानावे लागत आहे. अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये असलेल्या संगनमतामुळे महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. त्यामुळे जाहिरातबाजीचे निश्चित धोरण तयार करावे. तसेच शहरातील अनधिकृत फ्लेक्सला कायमचा आळा घालावा, अशी स्थायी समितीने प्रशासनाने वारंवार सूचना केल्या आहेत.
आयुक्तांची ठोस भूमिका
गुरूवारी झालेल्या सभेत सर्वच सदस्यांनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरत अनधिकृत फ्लेक्सबाजी रोखण्यासाठी काय कार्यवाही करणार?, असा सवाल केला होता. तसेच आठ महिन्यांपासून धोरण तयार होत नसल्यामुळे आकाशचिन्ह परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त कडूसकर यांना शासन सेवत परत पाठविण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली होती. सर्व सदस्यांचा रुद्रावतार पाहून महापालिका आयुक्तांना अनधिकृत फ्लेक्सबाजीबाबत ठोस भूमिका घ्यावी लागली होती.