5980 चौरस मीटर वर कारवाई
भोसरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभागाने भोसरीतील धावडे वस्ती आणि चिंचवड, मोहननगर येथील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. गुरुवारी केलेल्या कारवाईत सात बांधकामे भूईसापट करण्यात आली. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्राअंतर्गत धावडे वस्ती, भोसरी आणि चिंचवड, मोहननगर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु होती. या बांधकामावर आज अनधिकृत बांधकाम विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये एकूण सात अनधिकृत घरे क्षेत्रफळ सुमारे 5980 चौरस मीटर वर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहशहर अभियंता यांच्या अधिपत्याखाली महापालिकेचे संबंधीत कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली एक उपअभियंता, दोन कनिष्ठ अभियंता, आठ बीट निरीक्षक तसेच एक जेसीबी, पाच डंपर, दहा मजुरांच्या सहाय्याने करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामध्ये अतिक्रमण विभागाचे पालिकेचे दहा पोलीस, भोसरी ठाण्यातील पोलीस निरीक्षक, दहा पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त होता.