अनधिकृत बांधकामांवर हातोडा

0

माथेरान । एकीकडे शासन राज्यातील 2015 पर्यंतची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या वल्गना करीत आहे, तर माथेरान सारख्या दुर्गम पर्यटनस्थळावरील पिढ्यान्पिढ्या पासूनच वास्तव्यास असलेल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या निवार्‍यावर मुख्याधिकार्‍यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईचा बडगा उगारण्यासाठी मुख्याधिकारी सागर घोलप यांनी पोलीस बंदोबस्त मार्चच्या पहिल्याच पंधरवड्यात लेखी स्वरूपात मागवलेला असल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा हा कारवाईचा फार्स आवळला जाणार असल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण दिसत आहे. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी इथल्या गोरगरीब जनतेची घामातून उभ्या राहिलेल्या बांधकामांस अभय मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांना विनंती निवेदन दिले आहे. शासनाने डिसेंबर 2015 पर्यंतचे अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबत निर्णय घेतला असून तसे राज्यशासनाचे परीपत्रक प्रसिद्ध झालेले आहे. त्यानुसार माथेरान नगरपालिकेची तातडीची विशेष सभा होऊन ठराव क्रमांक 235 अन्वये दि.17 नोव्हेंबर 2017 रोजी माथेरान हद्दीतील डिसेंबर 2015 च्या पुर्वीची बांधकामे /अतिक्रमणे नियमित करण्याबाबत ठराव मंजूर झालेला असून सदरचा ठराव शासनाकडे जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांचेकडील 18 डिसेंबर 2017 रोजीच्या पत्रानुसार 2015 पुर्वीची अनधिकृत बांधकामे/अतिक्रमणे कशाप्रकारे अधिकृत करता येतील याची माहिती मुख्याधिकारी यांचेकडून मागवण्यात आलेली आहे. परंतु, जिल्हाधिकारी यांचेकडील पत्रातील आदेशावर कार्यवाही झालेली नाही तसेच मा.राष्ट्रीय हरित लवाद न्यायालय यांचेकडील 10 जानेवारी 2017 च्या पत्रानूसार दि.10, 11, 12 फेब्रुवारी 2017 रोजी माथेरानमधील अनधिकृत बांधकामांवर मुख्याधिकारी यांच्याकडून कारवाई करण्यात आली होती.

तसेच 2015 नंतर माथेरानमध्ये कुठल्याही प्रकारची नवीन बांधकामे झालेली नाहीत.त्यामुळे मुख्याधिकारी घोलप यांनी पुन्हा त्याच जुन्या पत्राचा संदर्भ घेऊन या मार्चमध्ये कारवाई करणे म्हणजे ही सूडबुद्धी असल्याचेसुद्धा नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत अनधिकृत बांधकामांवर शासननिर्णय होईपर्यंत तसेच राष्ट्रीय हरित लवाद यांचेकडील न्यायालयात अद्याप निर्णय प्रलंबित आहे. त्यानुसार लगेच कारवाई करणे उचित ठरणार नाही. तूर्तास होणारी कारवाई थांबवावी. न्यायालयाचा कोणताही आदेश नसताना तसेच शासनाच्या सन 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. अशावेळी कारवाई केल्यास नजीकच्या काळात शालांत परीक्षा सुरू झालेल्या आहेत. याचा विपरीत परिणाम एकंदरीतच इथल्या पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर, पर्यटनावर निश्‍चितपणे होईल. यामुळे इथल्या पिढ्यान् पिढ्या वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांच्या रोजगारांवर यामुळे गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामुळे शासनाचा महसूलसुद्धा बुडला जाऊ शकतो, असे नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मुख्याधिकारी सागर घोलप हे जाणूनबुजून गावाच्या महत्त्वाकांक्षी विकासकामांना तडीस नेण्यासाठी असमर्थता दर्शवत आहेत. त्यामुळे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांसह गटनेते प्रसाद सावंत, नगरसेवक नरेश काळे, शकील पटेल, विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांनी मुख्याधिकार्‍यांचा खरपूस समाचार घेतला. यामुळे अर्थसंकल्पाच्या सभेस काही काळ विलंब झाला. मुख्याधिकारी घोलप हे क्षुल्लक कामेसुद्धा कायद्याच्या आधार घेऊन करतात. परंतु, काही कामे त्यांच्याच मर्जीप्रमाणे करत आहेत असे आरोप काही नगरसेवकांनी केले. स्वच्छता अभियानात दिवसरात्र कामे करणार्‍या श्रमिकांच्या पैशांबद्दलसुद्धा निष्काळजीपणा दाखवून त्यांचे पैसे देण्यास नेहमीच टाळाटाळ करत आहेत. ठेकेदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिलेसुद्धा काहींना काही कारण दाखवून देण्यास दिरंगाई करत आहेत. आदिवासी लोकांनी रस्त्यांची कामे केली त्याबाबतसुद्धा सहा महिन्यांपर्यंत बिलांची रक्कम अदा केलेली नाही. घोलप यांच्याच कार्यकाळात आंदोलन ,उपोषण होत असून समस्त नागरिक त्यांच्या हेकेखोरी वृत्तीला पूर्णतः वैतागलेली आहे त्यांना फक्त गोरगरिबांच्या अनधिकृत कामांवर हातोडा टाकण्यात धन्यता वाटत असल्याचे बोलले जात आहे..

घोलप यांच्यामुळे गाव विकासापासून मागे असल्याचा केला आरोप
महाबळेश्‍वर या पर्यटनस्थळावर सर्रासपणे अनधिकृत कामे होत असताना तेथील मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील या तिथल्या गोरगरीब जनतेच्या अनधिकृत बांधकामांस अभय देत आहेत, पण हे मुख्याधिकारी मात्र स्थानिकांच्या निवार्यावर हातोडा टाकण्यासाठी सज्ज आहेत. यामुळे स्थानिक मंडळी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. नगरपालिकेतील काही कामगारसुद्धा काटेकोरपणाने कामे करीत नाहीत त्यांचे पगार काढू नयेत असेही नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी आवर्जून नमूद केले, तर मुख्याधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे नगरपालिकेस टाळ ठोकावे लागेल. कारण जनता आमच्याकडून कामांची अपेक्षा करीत असताना केवळ मुख्याधिकार्‍यांमुळे कामे पूर्ण होत नाहीत, असे नगरसेवक नरेश काळे आणि विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांनी संतापाने सांगितले. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हुतात्मा क्रांती ज्योत बसविण्यासाठी विलंब लावला जात असून जीवन प्राधिकरणाने खोदलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होतात यासाठी प्राधिकरणाला कोणत्या आधारावर परवानगी दिली असेही नगराध्यक्ष प्रेरणा सावंत आणि बांधकाम सभापती रुपाली आखाडे यांनी खडेबोल सुनावले. केवळ घोलप यांच्यामुळे आपले गाव विकासापासून मागे जात असल्याने गटनेते प्रसाद सावंत यांचाही पारा चढला होता. प्रकरण हमरीतुमरीवर गेल्यानंतर नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मध्यस्थी करून वातावरण चिघळून दिले नाही.