सुजाण नागरिक संघाचे कांबळे यांचा आरोप
पिंपरी-चिंचवड : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामांचा शोध घेणे, नोटिसा देणे यासाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेने बीट निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या. मात्र, कार्यकारी अभियंता आपल्यावरील कामाचा बोजा बीट निरीक्षकांवर टाकत आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामे वाढत असल्याचा आरोप सुजाण नागरिक संघाचे अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी केला आहे, अशा कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामे नियंत्रण व निर्मूलन यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने जे निर्देश दिले आहेत. त्याला केराची टोपली दाखवत, कार्यकारी अभियंता आपली जबाबदारी बीट निरीक्षकांवर टाकत आहेत. अशा कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करावी, बीट निरीक्षकांच्या नोंदवह्या तपासाव्यात, अशी मागणी केली आहे.