पुणे । पुणे महापालिकेच्या नगरसेवकांमध्ये सर्वात श्रीमंत असणार्या विजय शेवाळे यांनी गांजवे चौकात अनधिकृत बांधकाम केले आहे. पालिकेच्या बांधकाम विभागानेही त्यांना याबाबत वारवांर नोटीसा बजावल्या आहेत. पण अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेवाळे यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत विजय शेवाळे हे औंध-बोपोडी या प्रभागातून भाजपमधून निवडून आलेले आहेत. नवी पेठ आणि सदाशिव पेठेत येणार्या गांजवे चौकात घर क्र. 343/344 येथे अनधिकृत बांधकाम केले आहे. त्या ठिकाणी हॉटेल पुष्पविजय आणि शेवाळे मुलींचे हॉस्टेल आहे. हे बांधकाम पुर्णत: अनधिकृत आहे. त्यासंदर्भात पालिकेच्या बांधकाम विभागाकडे वेळोवेळी तक्रार करण्यात आली आहे. त्यावर बांधकाम विभागानेही त्यांना वारंवार नोटीस बजावल्या आहेत. विनापरवाना मुलींचे हॉस्टेल सुरू असल्याचा अहवाल तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिला आहे. पण अद्यापही या बाधकांमावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या अनधिकृत बांधकामावर कारवाई न करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.
अनधिकृत बांधकाम करून पालिकेची फसवणूक करणार्या विजय शेवाळे यांचे नगरसेवकांचे पद रद्द करावे, अशी मागणी सुधीर काळे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे. दरम्यान याबाबत विजय शेवाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवाळे यांंच्याशी संपर्क होऊ शकला नाही.